संप……..सध्या पेन्शन विरोधात शासकीय कर्मचा-यांनी संप करुन एल्गार पुकारलेला असून तो बेमुदत आहे. याला सरकार जबाबदार असून सरकार कोणत्याच प्रकारची पावलं उचलतांना दिसून आलेले नाही. मात्र या संपानं -याचशा सरकारी सुविधा प्रभावीत झालेल्या आहेत.
संपाबाबत मत नोंदविताना या संपाच्या दोन बाजू केल्या आहेत लोकांनी. कारण त्यांना नोकरी नाही. ज्यांना नोकरी नाही असे लोकं म्हणतात की कशाला हवी पेन्शन. यांना ते नोकरीवर असतांनाही भरगच्च पैसे द्या. वरुन पेन्शनही द्या. परंतू महाशय हो, अहो, वेतन ज्या कालावधीत मिळतं ही त्यांची मेहनत आहे. ते जेवढी मेहनत करतात ना, तेवढाही पैसा वेतनात मिळत नाही. त्या नोकरी दरम्यान एवढा डोक्याला त्रास होतो की ते कर्मचारी रात्रीही सुखाची झोप घेवू शकत नाहीत. रात्र रात्र जागतात अक्षरशः ते. ते आहेत म्हणून आपण आहोत. ते जर नसते तर आपणही नसतो.
ते नसते तर आपणही नसतो. त्याचं मी उदाहरण देतो. बघा, कोवीड – १९ चा काळ आपण अनुभवलाच असेल. या काळात आपणालाही माहीत आहे की किती भीती होती. लाॅकडाऊन होतं व कोणीही व्यक्ती घराच्या बाहेर पडत नव्हता. अशा काळात नोकरी आहे व आपण या देशाचे देणे लागतो या कर्तव्यानं तर काही लोकं नोकरी जाईल या भीतीनं बाहेर पडले. त्यांनी त्यावेळेस कशाचीही अर्थात घरादाराचीही पर्वा केली नाही. आपल्याला माहीत असेलच की मृत्यूही थयथय नाचत होता. स्मशानागत रांगा लागत होता. त्यावेळेस आपल्यालाही कोवीड होईल व आपणही मरण पावू ही भीती सरकारी कर्मचा-यांना होती. तरीही आपल्या मृत्यूची व घरादाराची पर्वा न करता ते बाहेर पडले. कोणासाठी तर आपल्यासाठी. आपली सेवा केली त्यांनी. आपल्या जिवाची पर्वा न करता. काही काही कर्मचारी यात मरणही पावले. मग त्यांचा परिवार आपण पोषला का? आज या महामारीत बरेचसे डाॅक्टर काही परीचारीका व आरोग्य कर्मचारी अशाच प्रकारच्या कोवीड महामारीच्या संपर्कात येवून मरण पावले. काहींनी वाचवलं रुग्णांना. कारण त्यांचेजवळ अतोनात पैसा होता. परंतू काही असेही वाचले की त्यांचेजवळ तुटपुंजा पैसा होता. जे गरीबही होते. कोवीडला हारवू शकत नव्हते. माहीत आहे ते कशाच्या भरवशावर वाचले. ते वाचले याच सरकारी कर्मचा-यांच्या भरवशावर. ज्यांच्याजवळ पैसा नव्हता. ते सरकारी रुग्णालयात भरती झाले. तिथं याच सरकारी कर्मचा-यांनी कशाचीही खंत न बाळगता त्यांचेवर उपचार केला.
दुसरं उदाहरण देतो ते सैनिकांचं. का गरज आहे त्यांना लढण्याची आणि आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला सुरक्षीत ठेवण्याची. परंतू ते केवळ आपल्यासाठी देशाच्या सीमेवर तैनात असतात. आपल्याला काही होवू नये म्हणून. माहीत आहे जर ते खाजगी असते ना व पेन्शन नसती ना. तर केव्हाच पळून आले असते सीमेवरुन. त्यातच प्रतिशत्रूनं आपल्यावर आक्रमण केलं असतं. त्यानंतर आपलं काय झालं असतं याचा इतिहास साक्षीदार आहे. अहो, इथं पोलीस कर्मचारीही आपलं रक्षण करतात जिवावर उदार होवून. आपल्याला माहीत असेल की देशावर गतकाळात झालेल्या आंतकवादी हमल्यात तुकाराम नावाचा एक पोलीस शिपाही मरण पावला. परंतू त्याचेचमुळे कसाब सापडला. नाहीतर त्या कसाबनं कितीतरी निरपराध लोकांचे प्राण घेतले असते.
उदाहरणं भरपूर आहेत. अहो, कोवीडच्या काळात कितीतरी शिक्षकांनी खपून आपल्या मुलांना शिकवलं. एवढंच नाही तर या शिक्षकांनी जिवावर उदार होवून चुंगीनाक्यावर नोकरी केली. कशासाठी तर बाहेरुन कोणताही संसर्गीत रुग्णं येवू नये व आपल्या जिल्ह्यात कोवीडचा प्रसार होवू नये आणि हे करीत असतांना त्यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडवला नाही. मोबाईलवर अभ्यास शिकवला. त्यातच ज्यांच्याकडे मोबाईल नव्हता ना. त्यांना घरी जावून वा त्यांच्या वस्तीत जावून दूर दूर बसवून अभ्यास शिकवला. अशी बरीच उदाहरणं देता येतील. परंतू लिहायलाही बंधन आहेत. आता तुम्ही म्हणाल की कोवीडसारखी महामारी एखाद्या वेळेसच येते. नेहमी येत नाही. त्याबाबतही सांगतो की देशात केवळ कोवीडच नाही तर भूकंप, महामारी, वादळं, आपादग्रस्त परिस्थिती नेहमीच चालत असते. आपल्याला माहीत असेल लातूर उस्मानाबादचा भूकंप. आपल्याला माहीत असेल मोवाडचा महापूर. अन् आपल्याला माहीत असेलच माळीणचं भुस्खलन. त्यावेळेस आठ आठ दिवस काम चाललं. मृतदेह कुजलेले होते. नुसता दुर्गंध येत होता. काम करणं जमत नव्हतं. तरीही सरकारी यंत्रणा काम करीत होत्या. कशासाठी तर आपल्याचसाठी. त्यांना माहीत होतं की एखादा जीव या मलब्यात दबून मरु नये. माहीत आहे माळीणच्या मलब्यात एक तीन वर्षाचं लेकरु तीन दिवसानंतर सापडलं. ज्यांचे मायबाप मरुन गेले होते. या सरकारी यंत्रणेत कोण काम करीत होते माहीत आहे. हेच सरकारी कर्मचारी. आपल्याला माहीत असेलच की सरकारी कर्मचारी असलेले पोलीस आपल्या सुरक्षेसाठी दिवस दिवसभर ताटकळत उभे राहतात. त्यांना साधं लघुशंकेलाही जाता येत नाही.
माहीत नसेल आपल्याला की शिवरायही पेन्शन देत होते आपल्या कर्मचा-यांना. म्हणून त्यांच्यासाठी मावळे जिवाला जीव देत.तानाजी मरण पावल्यानंतर त्यांनी उमरठे गावी जावून त्यांच्या मुलाचं म्हणजे रायबाचा विवाह करुन दिला त्यांनी. तसंच बाजीप्रभूच्याही मुलांना दगा दिला नाही. त्यांनी ब-याचशा विधवांचाही सन्मान दिला नव्हे तर त्यांचं पालनपोषण केलं. ह्याच गोष्टीचा अभ्यास करुन डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत पेन्शनबाबत कलमांचा समावेश केला. म्हणूनच आज पेन्शन मिळत आहे. नाही तर आजही श्रीमंतांचं राज्य असतं. गरीबांना कोणीही विचारलं नसतं. म्हणूनच लोकांनी सरकारी कर्मचा-यांच्या मागणीचा विचार करावा. अभ्यास करावा. दुषणे देवू नये.
असे हे सरकारी कर्मचारी. सरकार खाजगीकरणाची भाषा बोलतेय. कारण त्यांच्या डोक्याला असा ताप नको. माहीत आहे, सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांना त्यांच्या सेवेनं अनेक व्याधीही होतात. त्यावरही उपचार करण्यासाठी पेन्शन हवी असते. तसंच हे सुद्धा विचारात घ्या की सरकारी कर्मचारी नसतील ना देशात. तर तो देश देश राहणार नाही. त्या देशात अवकळा पसरेल. फक्त नि फक्त श्रीमंतांचंच राज्य असेल. तुम्हा आम्हाला कोणीही विचारणार नाही.
आज सरकारी कर्मचारी आहेत, म्हणून मजा आहे. देशात लोकशाही आहे म्हणून सारेच ओरडतात. पेन्शन कशाला हवी म्हणतात. माहीत आहे सरकारी कर्मचा-यांना जेव्हा रेकॉर्ड द्यायचा असतो ना वा पुर्ण करायचा असतो. तेव्हा तुमच्या भल्यासाठी त्यांना रात्रंदिवस जागं राहावं लागतं व रेकॉर्ड पुर्ण करावा लागतो. जेव्हा ते ड्युटीवर असतात ना. तेव्हा त्यांची वेळ केव्हाच संपून जाते. तरीही ते बारा बारा ते अठरा अठरा तास काम करीत असतात आपल्या झोपेची व आरोग्याची त्यातच शरीराची पर्वा न करता. यातूनच त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. मानसीक समस्या वेगळ्याच.
महत्वाचं सांगायचं म्हणजे हे सरकारी कर्मचारी. त्यांच्या अंगात जेव्हा रग असते ना. तेव्हा ते साऱ्यांचीच सेवा करतात. परंतू जेव्हा ते थकतात. तेव्हा त्यांचीही सेवा व्हायला हवी. त्यावेळी त्यांनाही आधार मिळायला हवा लेकरासारखा. यात वयाच्या अठ्ठावन वर्ष सेवा म्हणजे मायबापाचं कर्तव्य व पेन्शन म्हणजे मुलांचं कर्तव्य. आता पेन्शन नको म्हणणारी मंडळी केवळ मायबापासारखी सेवा करा म्हणतात आणि पेन्शन नाकारुन त्या मुलाचे कर्तृत्व नाकारतात. अर्थात ज्या मुलांना मायबापानं मोठं केलं. त्या मायबापाला म्हातारपणी मुलांनी जेवणखावण देणं मुलांचं आद्य कर्तव्य नाही का? तरीही ते समजून न घेता पेन्शन नाकारणारी मंडळी अशा सेवा करणा-या व मायबापागत सेवा करणा-या कर्मचा-यांची अवस्था त्या मायबाप कर्मचा-यांची पेन्शन नाकारुन त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्यासारखी करतात. यात काहीच तिळमात्र शंका नाही आणि तिळमात्रही असत्यता नाही. महत्वपुर्ण बाब ही की जे मायबाप अगदी म्हातारपणापर्यंत आपल्या मुलांना पोषतात. मग त्यांची अपेक्षा असते की म्हारपणानंतर मुलांनी आपल्याला पोषावं. तीच ग अपेक्षा सरकारी कर्मचा-यांचीही असते. अगदी त्याच बापागत हे सरकारी कर्मचारी आयुष्याच्या अठ्ठावन वर्षपर्यत राब राब राबतात, कोणतीच अपेक्षा करीत नाहीत आपल्याकडून. मग त्यांच्या उतारवयात म्हणजे ते निवृत्त झाल्यानंतर आपण त्यांना पेन्शन देणं हा आपला नैतिक अधिकार नाही का? तरीही आपण त्यांचा अधिकार नाकारतो. त्यांना कशाला हवी पेन्शन म्हणतो. त्यांचेवर ताशेरे ओढतो. हे बरोबर नाही. विचार करा की ते आहेत, म्हणून तुम्ही आहात. तुमच्या जगण्यालाही अर्थ आहे. ते जर नसते तर तुम्हीही नसते आणि तुमच्या जगण्यालाही अर्थ उरला नसता. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे
नागपूर ९३७३३५९४५०