परभणी,दि 25 ः
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे निश्चित झालेल्या २५ एप्रिल या दिवशी जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाकडून जिल्हाभरात विविध कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्यात आली.
हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपायोजनांचा अंमलबजावणी मध्ये जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार देशात सन २०३० पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे लक्ष असून याकरिता आरोग्य विभागाकडून मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्याकडून घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर तात्पुरते डास उत्पत्ती स्थाने ग्रामपंचायतला माहिती देऊन त्यांच्या मार्फत नष्ट करण्यात येत आहेत. कायमस्वरूपी असलेले डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून शौचालयाच्या व्हेंड पाईपला जाळ्या बसवण्यात येणार आहेत.
२५ एप्रिल ला जागतिक हिवताप दिनानिमित्त परभणी येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी तहसीलदार गणेश चव्हाण,मनपाच्या डॉक्टर कल्पना सावंत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कालिदास निरस, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी गोविंद पिंगळीकर, प्राचार्या आशा घोडके ई उपस्थित होते. यावेळी परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी तसेच खाजगी नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी होते. रॅली जिल्हाधिकारी कार्यालय,नवीन जिल्हा परिषद इमारत मार्गे नारायण चाळ,नवा मोंढा येथून जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारती मधील सभागृहात रॅलीचा समोर करण्यात आला. समारोपप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी हिवताप कार्यक्रमांतर्गत कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करून तब्बल दरमहा संशयित रुग्णांचे जवळपास २० हजार रक्त नमुने घेत असल्याबद्दल तसेच हिवताप दुरीकरण कार्यक्रमांमध्ये परिपूर्ण सहभाग घेतल्याबद्दल प्रशंसा केली.
२६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील बस स्थानक, बाजार व महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शन लावण्यात येणार आहेत तसेच १०० घरांचे ताप सर्वेक्षण व कंटेनर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. २७ एप्रिल ला गप्पी मासे सोडणे, गप्पी मासे पडताळणी, डास उत्पत्ती स्थाने पडताळणी करण्यात येणार आहेत. २८ एप्रिलला आरोग्य विषयक म्हणी लिहिणे, गप्पी मासे पैदास केंद्र कोड लिहिणे, गप्पी मासे पैदास केंद्र पडताळणी होणार आहे. २९ एप्रिलला स्थलांतरित मजूर, ऊसतोड मजूर, साखर कारखाना मजूर यांचे ताप सर्वेक्षण, परिसर सर्वेक्षण होणार आहे. ३० एप्रिल ला कार्यक्षेत्रातील शाळा, आश्रम शाळा, कार्यालय येथे ताप व कन्टेनर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक अशा स्वयंसेविका परिश्रम घेत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.