परभणी,दि 28 ः
राष्ट्र उभारणीच्या कार्यात देशातील प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असते त्यातही युवकांची भूमिका महत्त्वाची ठरते कारण युवक हे बदल घडवून आणण्यास सक्षम असतात. देशाचा भविष्यकाळ अधिक उज्वल करायचा असेल तर तरुणांचे मन, मस्तिष्क आणि मनगट मजबूत असणे गरजेचे आहे असे विचार प्रा.डॉ. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.
स्वा.रा.ती.म विद्यापीठ नांदेड व स्व. नितीन महाविद्यालय पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने कै.स गो.नखाते विद्यालय,देवनांद्रा पाथरी येथे (दि.28 रोजी)आयोजित बहिःशाल व्याख्यानमालेत ‘राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका’या विषयावर ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी.एच.होगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस .टी. सामाले यांची उपस्थिती लाभली. पुढे बोलताना डॉ.शिंदे म्हणाले की,ज्यांच्या बळावर आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो आहे तो तरुण मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृढ असला पाहिजे या तरुणांनी स्वतः व्यसनापासून दूर राहून इतरांनाही व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली पाहिजे. त्याचबरोबर ग्रामस्वच्छता, पर्यावरण रक्षण यासारख्या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मोरे जी.जे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षक हर्षवर्धन नाथभजन यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व पालकांची उपस्थिती लाभली.