युवकांनी जिद्द, चिकाटी तसेच सातत्याच्या बळावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे-अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते यांचे आवाहन

परभणी (१६) विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये मिळणाऱ्या सुविधांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा बहुआयामी विकास करावा. सोबतच अभ्यासात जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे असे आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बुधवार (दि.१६) रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, समन्वयक डॉ.परिमल सुतवणे, डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ.विजय परसोडे उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा तयारी आणि तंत्र या विषयावर मार्गदर्शन करताना मिनीनाथ दंडवते पुढे म्हणाले, विद्यार्थी जीवनामध्ये अशक्य काहीच नसते. शक्य करण्याची क्षमता ओळखून आपण करिअर निवडले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना लाखो विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात परंतु मोजकेच परीक्षेत यशस्वी होतात. यशस्वी विद्यार्थी हे कुशलतेने परीक्षेचा मोजकाचा अभ्यास करतात. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे तंत्र विद्यार्थ्यांनी अवगत करावे. आपल्या क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची पूर्ण क्षमतेने तयार केल्यास यश नक्कीच मिळते यात शंका नाही.विद्यार्थी दशेत आपल्या करिअरच्या दिशा निश्चित नाही केल्या तर या व्यावहरिक जगात तुम्हाला किंमत राहत नाही त्यामुळे आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी करावी आणि यश संपादन करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी म्हणाले महाविद्यालयाने पुरवलेल्या सेवा सुविधांचा विद्यार्थ्यांनी फायदा घेत आपल्या क्षमतांचा विकास करावा. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवत असताना नियोजनपूर्वक अभ्यास करावा. यशस्वी होण्यासाठी स्वतःला अभ्यासात झोकून देत धाडसाने यशाला गवसणी घालावी.स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी जरी असले तरी आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे जेणेकरून यश मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. परिमल सुतवणे, सूत्रसंचालन डॉ. तुकाराम फिसफिसे तर आभार डॉ. विजय परसोडे यांनी केले. यावेळी डॉ.जयंत बोबडे, डॉ.प्रवीण नादरे,प्रा.प्रवीण कदम,प्रा.संजय भिसे, प्रा. अमोल भराड, प्रा. पल्लवी देशपांडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पेदापल्ली, साहेबराव येलेवाड आदींनी पुढाकार घेतला. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment