परभणी (०१) भारतात स्टार्टअपला मिळालेली गती तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रातल्या वाढत्या संधी लक्षात घेता काळाची पावलं ओळखून युवकांनी स्टार्टअपला सुरुवात करून आपले करिअर घडवावे असे प्रतिपादन नांदेड येथील सायन्स महाविद्यालयातील वैज्ञानिक प्रा.डॉ.विजयकिरण नरवाडे यांनी गुरुवार (दि.२९) रोजी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या नवोपक्रम मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी,नवोपक्रम मंडळाचे अध्यक्ष तथा उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे आदींची उपस्थिती होती. ऑनलाईन पद्धतीने आयोजित या व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ.नरवाडे पुढे म्हणाले, देशात लघु उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाने नवनवीन योजना आखल्या आहेत त्यासोबतच अनुदानाचे उपलब्धता केली आहे. उत्पादनच नाही तर कमी खर्चात सुरू होणाऱ्या सेवा क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेणारे स्टार्टअप सुरू झाले आहेत.विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षण घेत असताना याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपले करिअर घडवू शकतात हे सांगून त्यांनी जिल्ह्यतील अनेक स्टार्टअपचे उदाहरणे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, नवोपक्रम विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन नवीन लघु उद्योगाकडे वळले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात डॉ.नितोंडे यांनी एकंदरीतच मंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विवीध उपक्रमांची माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रोहिदास नितोंडे, सूत्रसंचालन डॉ.सचिन येवले, पाहुण्याचे परिचय डॉ.सुरेंद्र येनोरकर तर आभार डॉ.विजय कळमसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयप्रकाश गायकवाड, प्रा.रविशंकर झिंगरे, डॉ.जयंत बोबडे, डॉ.नानासाहेब शितोळे, डॉ.चारुदत्त बेले,डॉ.गणेश चलींदरवार, प्रा.शरद कदम आदींनी पुढाकार घेतला.