अमरावती बंद हिंसाचार प्रकरण: माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजप नेत्यांना अटक, पालकमंत्र्यांचा इशारा

0 106

शब्दराज ऑनलाईन,दि 15 ः
अमरावतीत बंद’मध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या १४ नेत्यांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे पासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून भाजपाच्या नेत्यांना अटक करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. भाजपाचे नेते आणि महापालिकेचे गटनेते तुषार भारती यांना त्यांच्या घरुन अटक करण्यात आली. त्याचबरोबर माजी आमदार अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं आहे. एकीकडे हे अटक सत्र सुरु असतानाच दुसरीकडे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दंगल करणांंऱ्या एकालाही सोडणार नाही, असा थेट इशाराच दिल्याने भाजपा नेत्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

घडलं काय?
भाजपाने १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला नंतर हिंसक वळण लागलं. त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केल्याचं पहायला मिळालं. आता याच प्रकरणामध्ये पोलिसांनी भाजपाच्या १४ नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.

अमरावतीत दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही- यशोमती ठाकूर

दोन दिवस अमरावतीत दहशत माजवणाऱ्यांना आता सोडणार नाही, असा सूचक इशारा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. तसेच रविवार आणि सोमवारी अमरावतीत कोणत्याही प्रकारचे हिंसक कृत्य घडलेले नाही. शहरात संचारबंदी असून नागरिकांना दुपारी 2 ते 4 या वेळेत मूलभूत सुविधांसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे. लवकरच शहरातील वातावरण पूर्वपदावर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शहरात सध्या 4 ते 5 हजार पोलीस तसेच राज्य राखीव दलदेखील बंदोबस्तासाठी तैनात आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

ज्यांच्या घरी तलवारी आहे, त्यांची झडती घ्या- बोंडे

दरम्यान, अटक झाल्यानंतर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी हिंदू मार खाणार नाही. ज्यांच्या घरात खरोखरच्या तलवारी आहेत, त्यांची झाडाझडती घेऊन दाखवा, असे आवाहनही त्यांनी पोलीस आणि अमरावती प्रशासनाला दिले.

 

error: Content is protected !!