शिक्षक नव्हे हैवान…. दात पडेपर्यंत विद्यार्थ्याला बदडलं

0 47

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परवानगीशिवाय पाणी प्यायला म्हणून एका शिक्षकाने नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली आहे. यात विद्यार्थ्याचा दात पडला आहे. एका खासगी शाळेतल्या निर्दयी शिक्षकाच्या या प्रतापामुळे विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकाविरुद्ध संतापले आहेत. शिक्षकांनी बेदम मारल्यानंतर विद्यार्थ्याने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार देवास येथील होली ट्रिनिटी स्कूलमधील शिक्षकाने नववी इयत्तेत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला परवानगीशिवाय पाणी प्यायल्याबद्दल इतकं मारलं की, त्या मारहाणीत त्याचा दात पडला. त्यानंतर विद्यार्थ्याने या मारहाणीची माहिती आपल्या वडिलांना दिली. होली ट्रिनिटी स्कूलचा विद्यार्थी त्याच्या वडिलांसह जनसुनावणीला गेला आणि त्याने देवास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्याला म्हणाले की, “असा कोणता शिक्षक आहे जो विद्यार्थ्याला अशा प्रकारे मारतो. या प्रकरणाचा तात्काळ तपास करा.” होली ट्रिनिटी स्कूल सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या विजय नगर येथे आहे.
पीडित विद्यार्थी सक्षम जैन नववीत शिकतो. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो वर्गात पाणी पित होता. त्यावेळी शाळेतील शिक्षक पीटरने विद्यार्थ्याच्या हातातली पाण्याची बाटली हिसकावून त्याच बाटलीने त्याला मारलं. यात सक्षमचा दात पडला. अशाच अवस्थेत सक्षम आपल्या वडिलांकडे गेला. त्यानंतर सक्षमचे वडील त्याला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालायत गेले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता यांनी घटनेची माहिती घेऊन डीपीसी प्रदीप जैन यांना तपासाचे आदेश दिले आहेत. डीपीसी शाळेत पोहोचले त्यानंतर एक तास मुख्याध्यापक शाळेत आले नाहीत. त्यानंतर डीपीसी विद्यार्थ्यांशी बोलले, तसेच शिक्षक पीटर यांची बाजू त्यांनी जाणून घेतली. डीपीसींनी शाळेतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. शाळा व्यवस्थापनाने म्हटलं आहे की, पालक सांगतील त्याप्रमाणे आरोपी शिक्षकाविरोधात आमची समिती निर्णय घेईल.

error: Content is protected !!