नात्यांचा गोडवा जपणारे अशोक मामा

0 17

 

प्रत्येक माणूस हा या पृथ्वीतलावरील पाहूणा म्हणून जन्माला येतो. एक दिवस हे जग सोडून सर्वांना जायचे आहे, हे निर्विवाद सत्य आणि अंतिम सत्य आहे. परंतु काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं करतात. त्या माणसामुळे आपल्या आयुष्याला, जगण्याला आणि नात्याला वेगळं वलय प्राप्त होत त्यापैकी एक व्यक्तिमत्त्व ज्यांनी मला नाती कशी जपली जावीत आणि ती कायम कशी जोडून ठेवावीत याचा परिपाठ शिकवला ते म्हणजे स्व.अशोक मामा होय. स्वर्गीय शब्द लिहिताना ही माझे बोटं धजत नाहीत कारण आपण गेलात याची कल्पना मला असहाय्य होत आहे. मामा गेल्याची बातमी फोनद्वारे ऐकली आणि निशब्दच झालो. खरं पाहिलं तर ही सर्वच नाती आपल्याला आयुष्यभर सोबत असावी वाटतात. हे वाटणं माणसाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. खऱ्या अर्थाने हे वाटणे त्या व्यक्तीविषयीची आपुलकी, प्रेम, जिव्हाळाच असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात
“तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा, काय महिमा वर्णूं त्याची॥”
या उक्तीप्रमाणे मामांचे व्यक्तिमत्व आहे असे मला वाटते. खरंच आपल्या आयुष्यात मोजकेच माणसं असतात जी आपल्या वागण्या-बोलण्यावर आणि एकंदरीतच आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकून जातात त्यापैकीच एक अशोक मामा आहेत.
माणसांने कुटुंब आणि समाजात कसं वागावे, कसं राहावं याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मामा होत. लहानापासून ते मोठ्यापर्यंतच्या सर्व मित्रमंडळी, आप्तस्वकीय पाहुणे तसेच घरच्या सदस्यांना प्रेमाने आपुलकीने आणि जिव्हाळ्याने विचारपूस करून त्यांच्या सुखदुःखात वाटेकरी होणारे अशोक मामा आयुष्यभर माणसं जोडत गेले. त्यात मग कधी भागवत मामा सारखे भाऊ मित्र म्हणून लाभले तर कधी नात्याच्या पलीकडे जाऊन मित्रत्वाची नाती जोडली. असा हा हरहुन्नरी आमचा मामा खूप प्रेमळ आणि संवेदनशील होता. एवढंच नाहीतर मामा आपण एक माणूस म्हणून सर्वोत्तम व्यक्तिमत्व होत. एक कर्तव्यपरायण मुलगा, पती, भाऊ, वडील, सहकारी आणि मित्र म्हणून अशोक मामांची कारकीर्द उत्तम राहिली आहे. मी लहानपणी सुट्ट्यात बहुतांश वेळी परळीला असायचो. कालांतराने अंबाजोगाई येथे नोकरी निमित्ताने तीन वर्ष होतो. बऱ्याचदा मामाशी भेट व्हायची. भेटी वेळी आपसूकच मामाविषयी एक आकर्षण मला होतं. त्यांचं बोलणं, वागणं, राहण, प्रेमाने आवाज देणे आणि एकंदरीतच त्यांच्या व्यक्तिमत्वाला जो गोडवा होता तो सतत मला आकर्षित करायचा.
त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आली परंतु संकटांना न डगमगता त्या संकटांना दोन हात करीत ती पार ही केलीत आपण. सगळ्या भावंडांमध्ये आपुलकी, प्रेम, जिव्हाळा कसा राहील या संदर्भात आपण कसोशीने प्रयत्न करायचात. नात्याची मोट बांधून ठेवायची कला जन्मजातच आपल्यात होती हे निर्विवाद सत्य म्हणावे लागेल. जाधव वाड्यात कोणाचे लग्नकार्य असेल त्यात मामांचा सहभाग हिरिरीने असायचा. हा त्यांच्या स्वभावातला मूलभूत गुण सर्वांना आश्चर्यचकित करत असे. पत्रिका वाटप करणे, मंडप डेकोरेशन, पाहुणे मंडळी तत्परतेने आणि चौकसपणे कार्य करत असे. जिथे जायचात तिथे माणसं जोडणे हा आपला स्वभाव गुणधर्म अफलातून होता. आईने दिलेल्या प्रेमाची शिदोरी नेटाने पुढे नेण्याचे काम मामांनी केले. हा वारसा पुढची पिढी समर्थपणे पेलेलं यात काही दुमत नाही. मामा आपण आयुष्यात अनेक खाचखळगे पाहिली त्यातून बाहेर ही निघालात. सतत आर्थिक विवेंचनेत असताना ही मुलाबाळांचे शिक्षण, आपला आणि कुटुंबाचा दैनंदिन खर्च तुटपुंज्या पगारीवर भागविलात हा आपल्याकडून प्रत्येकाने घेण्यासारखा आदर्श महत्वाचा वाटतो. मामा भेटणाऱ्या प्रत्येकाला आदराने बोलत, त्या व्यक्तीला सन्मान देत हा संस्कार केवळ आपल्याकडूनच शिकावा.
वीसेक दिवसापासून मला उगीचच वाटत होते की खूप वर्ष झालेत आपण परळीला गेलो नाहीत आदरणीय भाऊमामा, आप्पामामा, अशोक मामा,आबामामा, राजूमामा ,बंडू मामा, बालू मामांना भेटलो नाहीत. त्यामुळे अधूनमधून मनात परळीला जायचा विचार यायचा. पण महाविद्यालयीन व्यस्ततेमुळे जाता आले नाही. आता कायमच आयुष्यभर अशोक मामाला न भेटल्याची खंत मनात राहील. कोरोनाने जगाला आणि पर्यायाने मला ही नात्यांची किंमत उमजली. अशोक मामाकडे बघितलं की नात्याची गुंफण कशी करावी ही गोष्ट मला नेहमीच अप्रूप वाटायची. आता ही अप्रूप कोणाकडे बघून वाटेल याबाबत मला चिंता वाटते.
नक्कीच आपण गेल्याने माझ्यासारख्या भाच्याला पोरकेपणा वाटत आहे. एव्हाना जाधव परिवार ही आपल्या नसल्याने पोरका झाला आहे.
आदरणीय मामा आपण आपल्या आचार- विचारातून जगण्याचा, बोलण्याचा, एकंदरीतच आदर्शवादी आयुष्याचा आदर्श घालून दिलात जे पुढील पिढीसाठी दिशादर्शकच म्हणावा लागेल.
मामा, आपण वेळीच जागरूक होऊन आरोग्याविषयी काळजी घेतली असती तर आज आम्ही आपणांस भेटू शकलो असतो. दुर्दैवाने आपणांस तस सुचलं नाही. कदाचित हेच ईश्वरास मान्य असावे.
आदरणीय मामा नक्कीच आपण दिलेल्या आदर्शावर आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करू….. आपणांस हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल…..
विनम्र आदरांजली…..
                                                                    प्रा.डॉ.जयंत बोबडे
                                                    , श्री शिवाजी महाविद्यालय परभणी
                                                                      9511850778

error: Content is protected !!