बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर..म्हणाले हे एक तरी पारदर्शक काम करावं

0 215

 शब्दराज ऑनलाईन,दि 18ः
आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता शाळेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. बच्चू कडू यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं किमान हे एक तरी पारदर्शक काम करावं अशा शब्दात बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.

आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मागील वेळी परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही गोंधळ उडाला आहे. परीक्षा पुढे ढकलूनही नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात येत आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. राज्य सरकारनं किमान एक तरी पारदर्शक काम करावं, अशी खोचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय. आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरीही न्यासा कंपनीला पुन्हा परीक्षेचं काम दिल्याची खंत आहे. ज्या कंपनीने घोळ केला तरी त्यांना काम द्यायचं कारण काय? असा सवालही बच्चू कडू यांनी यावेळी विचारला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला सल्ला दिलाय. एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

error: Content is protected !!