लोहा येथे भारत राष्ट्र समितीची सभा :प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांची माहीती

0 35
परभणी,प्रतिनिधी
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे संस्थापक चंद्रशेखर राव यांची रविवारी (दि.26) महाराष्ट्रातील दुसरी सभा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील सर्व निवडणुका पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची माहिती भारत राष्ट्र समिती किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी दिली.
भारत राष्ट्र समितीच्या विस्तारासाठी होणार्या सभेची माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि.23) पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी तथा निजामाबाद येथील बाजार समितीचे सभापती सुधाकर पोला, शेतकरी संघटनेचे नेते रंगनाथ चोपडे, अमृत शिंदे, बाळासाहेब आळणे, जाफर तरोडेकर आदी उपस्थित होते. श्री.कदम यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने तेलंगणा राज्यातील शेतकरी हिताच्या योजना पाहून आता त्या राबविण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. खरेतर या योजना पाच – दहा वर्षांपूर्वीच आपल्या राज्यात यायला हव्या होत्या. तेलंगणा राज्यात शेतकर्यांच्या हक्काचे सरकार असल्याने संपूर्ण क्रांती झाल्याचे पहावयास मिळत असल्याचा दावा कदम यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, तेलंगणा राज्यात शेतकर्यांना 24 तास वीज मिळते, एकरी 4 हजाराची मदत शेती खर्चासाठी दिली जाते. कुणाचा मृत्यू झाल्यास मयताच्या कुटुंबास 10 दिवसात 5 लाखाची आर्थिक मदत सरकार कडून केली जाते. मुलीचा विवाह झाल्यानंतर लगेच नवदाम्पत्य यांच्या नावे 1 लाख 35 हजार रुपये सरकारकडून जमा केले जातात. महसूल मध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी तेलंगणातील शेतीचे सर्व व्यवहार ऑनलाईन व पारदर्शक केले असून सर्व तलाठ्यांना काढून दुसर्या विभागात समायोजन केले आहे. तेलंगणा मॉडेल मुळे 2016 नंतर त्या राज्यात शेतकरी आत्महत्या थांबल्या असल्याचा दावा देखील कदम यांनी केला. 2014 पूर्वी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेले तेलंगणा आज पाणीदार राज्य झाल्याचे श्री.कदम यांनी सांगितले. सुधाकर पोला यांनीही भारत राष्ट्र समितीच्या कामाची माहिती देत महाराष्ट्र राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी निरनिराळ्या भागात जाहीर सभा व मेळावे आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 3 माजी सदस्य, पंचायत समितीचे 7 माजी सदस्य तसेच 20 गावचे सरपंच व विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भारत राष्ट्र समिती पक्षात लोहा येथील सभेत जाहीर प्रवेश करणार आहेत. या सभेला जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष कदम व पोला यांनी केले आहे.
error: Content is protected !!