मोठी बातमी..’या’ राज्यात रात्री भोंगा बंद

0 19

: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांवरून जोरदार वाद सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भोंग्यांवर बंदी घातली जावी अशी मागणी करण्यात आली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी तीन मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्यात यावेत असा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर चार मे रोजी मनसेच्या वतीने राज्यभरात भोंगे हटाव आंदोलन देखील करण्यात आले. या प्रकरणात अनेक मनसैनिकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान आता हा वाद कर्नाटकमध्ये  पोहोचला आहे. कर्नाटक सरकारकडून भोंग्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नव्या निर्बंधांनुसार रात्री दहा ते सकाळी सहा या काळात राज्यात भोंग्यांचा वापर करण्यास प्रतिबंध असेल. जर एखाद्या विशेष कार्यक्रमासाठी रात्री दहानंतर लाउडस्पीकरची गरज असेल तर त्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. कर्नाटक सरकारच्या वतीने याबाबत नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

काय म्हटलंय नव्या आदेशात?

कर्नाटक सरकारकडून भोंग्यांबाबत नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. कर्नाटक सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सभागृह, कॉन्फरन्स रूम आणि कम्युनिटी हॉल वगळता इतर ठिकाणी रात्री दहा ते सकाळी सहावाजेपर्यंत भोंग्यांच्या वापराला बंदी असेल. इतर ठिकाणी लाउडस्पीकर वापरता येणार नाही. रात्री दहा नंतर लाउडस्पीकर वापरायचा असेल तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेत. यासाठी कर्नाटक सरकारकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देखील देण्यात आला आहे. रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा सांभाळली जावी असे आदेश यापू्र्वीच सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. याच निर्णयाचा संदर्भ राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.

भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात गोंधळ

मशिदीवरील भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झालेल्या एका भाषणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी ठाण्यात झालेल्या सभेत भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. चार मे रोजी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र आता या वादाचे लोन इतर राज्यात देखील पसरले असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक मशिदींवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. तर कर्नाटकमध्येही आता भोंग्यांच्या वापरावर रात्री दहा ते सकाळी सहावाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

error: Content is protected !!