भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,शेलारांकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद

0 15

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून दिल्लीत घोषणा करण्यात आली. यातून भाजपने राज्यातील ओबीसी समीकरणात समतोल साधल्याचे बोलले जात आहे.

ओबीसी नेत्यांच्या खच्चीकरणाचा आरोप

राज्यातील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप राज्यातील आणि केंद्रीय भाजप नेतृत्वावर सातत्याने केला जात आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना राज्यातील राजकारणात पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. २०१९ मध्ये बावनकुळे यांचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले. गडकरी आणि फडणवीस यांनी खूप प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यावेळीही ओबीसी नेत्यांचे पंख कापले गेल्याचे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करीत पक्षनेतृत्वाने एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.

10 वर्षांत ओबीसी प्रदेशाध्यक्ष नाही

भाजप राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. तसेच, गेल्या 10 वर्षांत भाजपचा प्रदेशाध्यक्ष ओबीसीमधून झालेला नाही. सुधीर मुनगंटीवार यांची मुदत 2013 मध्ये संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर रावसाहेब दानवे आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सूत्रे गेली. भाजपचा ओबीसी हा मोठा पाठीराखा आहे. मात्र प्रमुख पदांवर त्यांच्यातील नेते नाहीत, असा संदेश जाऊ नये म्हणून बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

तिकिटवाटपाची जबाबदारी

बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या वेळी भाजपची भूमिका आक्रमकपणे मांडली. तसेच 2019 मध्ये त्यांचे विधानसभेचे तिकिट कापल्यानंतरही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि संघटनेचे काम करत राहिले. त्यानंतर त्यांना नुकतेच विधान परिषदेवर घेण्यात आले. आता त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहे. याचाच अर्थ जे बावनकुळे स्वतःचे तिकिट 2019 मध्ये मिळवू शकले नाहीत, त्यांच्याकडे आता तिकिट वाटपाची जबाबदारी आलेली आहे, असे मानले जात आहे. कारण तिकीट वाटपात प्रदेशाध्यक्षाचे मत विचारात घेतले जाते.

म्हणून शेलारांकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद

प्रदेशाध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांचे नाव काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत होते. पण ते मुंबईचे असल्याने आणि आता या पदासाठी मराठा चेहरा देणे योग्य नसल्यानेदेखील शेलार यांचे नाव शर्यतीत नव्हते. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने शेलार यांच्याकडे मुंबईची सूत्रे देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची आगामी काळात निवडणूक असल्याने शेलार यांचा उपयोग तेथे जास्त होणार आहे. मुंबई अध्यक्षपदी शेलार यांची नियुक्ती करण्यात आली हे स्पष्ट आहे.

error: Content is protected !!