समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याच्या प्रकल्पासाठी बीएमसीकडून सल्लागार नियुक्त

0 106

गुरुदत्त वाकदेकर
मुंबई,दि 17 ः
समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी मनोरी येथे उभारण्यात येणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी पालिकेने आता सल्लागार नियुक्त केले आहेत. प्रतिदिन २० कोटी लिटर पाण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. या कामासाठी नेमलेल्या सल्लागाराला पालिका दहा कोटी रुपये देणार आहे.

मुंबईला दररोज सात धरणांतून ३८०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र एखाद्यावर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. त्यातच येत्या काळात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणीही वाढणार आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत उपलब्ध असलेल्या १२ हेक्टर जागेवर प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. इस्त्रायलमधील एका कंपनीने पालिकेला या प्रकल्पाबाबत प्रस्ताव दिला आहे. या एकूण प्रकल्पाचा खर्च साडेतीन हजार कोटी असणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही त्या कंपनीला देण्यात येणार असून त्याकरीता पालिका साडे पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. आता या प्रकल्पासाठी पालिकेने सल्लागार नेमला असून त्याकरिता दहा कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रकल्पाची संकल्पचित्रे, आरेखन, निविदा दस्तावेज, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण ही कामे सल्लागाराकडून करून घेतली जाणार आहेत. या सल्लागाराचा कंत्राट कालावधी ४२ महिन्यांचा आहे.

error: Content is protected !!