मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या साथीदाराची भेट, चर्चांना उधाण

0 167

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली. कीर्तिकरांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन शिंदेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गजानन कीर्तिकर गेल्या काही काळापासून आजारी आहेत. त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन राजकीय जीवनात पुन्हा एकदा सक्रिय व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेल्या सहा लोकसभा खासदारांमध्ये असलेले कीर्तिकर शिंदे गटात जाणार का, असा सवाल आता विचारला जात आहे.
गेल्या आठवड्यात गजानन कीर्तिकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यामुळे मुंबईतील रहेजा रुग्णालयात त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. यानंतर तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी कीर्तिकर याना दिलेला होता.

ही शस्त्रक्रिया होऊन नुकतेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात आली. ही बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजल्यावर शिंदे जातीने कीर्तिकरांच्य निवासस्थानी गेले. आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने त्यांची भेट घेत शिंदेंनी तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कोण आहेत गजानन कीर्तिकर?
गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
१९९० ते २००९ या काळात चार वेळा आमदार राहिले आहे
कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते.
शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा अंदाजे १,८३,००० मतांच्या फरकाने पराभव केला.
ते सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या अठरापैकी बारा लोकसभा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. मात्र उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या सहा खासदारांमध्ये गजानन कीर्तिकर यांचा समावेश होतो. नुकतंच संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपल्यासोबत असलेल्या खासदारांची नावं सांगितली होती. त्यामध्ये कीर्तिकरांचंही नाव होतं, मात्र आजारी असल्यामुळे ते दिल्लीत उपस्थित राहू शकत नसल्याचं राऊतांनी सांगितलं होतं. परंतु आता अचानक एकनाथ शिंदे यांनी कीर्तिकरांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

error: Content is protected !!