पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा – सीईओ शिवानंद टाकसाळे

जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख १९ हजार ८६९ बालकांसाठी २३ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

0 98

परभणी,दि 10 (प्रतिनिधी)ः
भारत पोलिओ मुक्त आहे तरीही अद्याप काही देशांमध्ये पोलिओ चे रूग्ण आढळून येतात. हाच पोलिओ आपल्या देशात परत येवू शकतो. त्यामुळे बालकांच्या संपूर्ण सुरक्षितेसाठी पोलिओचा डोस अत्यावश्यक आहे. यासाठी २३ जानेवारी २०२२ रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हा परिषदेचे सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. रावजी सोनवणे,जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ गणेश सिरसुलवार, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी शिवानंद टाकसाळे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची कोविड चाचणी करण्यात यावी. त्याचबरोबर योग्य मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. साधनसामुग्री याचीही उपलब्धता ठेवावी. पोलिओ लसीकरण बुथची योग्य पध्दतीने उपलब्धता ठेवावी. त्याचबरोबर सद्यस्थितीत जिल्ह्यात ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या कामगारांच्या कुटुंबातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचेही लसीकरण होण्यासाठी नियोजन करावे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठीही आलेल्या कामगारांच्या कुटुंबातील बालकांचे लसीकरण करावे. जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन, बसस्थानके व महत्वाची स्थळे या ठिकाणी पोलिओ लसीकरण बुथ सज्ज ठेवावे. लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांच्या याद्याप्रमाणे घरोघरी जावून लसीकरणाबाबत संबंधित कुटुंबांना, पालकांना अवगत करावे, असे सांगून लसीकरण बुधवार दिनांक २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असले तरी पुढील दोन ते तीन दिवस हे लसीकरण सुरू राहणार असल्याने पात्र असणाऱ्या बालकांचे त्यांच्या पालकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना शिवानंद टाकसाळे म्हणाले की, पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी गावनिहाय व प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय नियोजन करण्यात येणार असून यामध्ये जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण होईल याची दक्षता घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक लस ही उपलब्ध होणार असून त्याचेही वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल. आरोग्य विभागाचे कर्मचारी लाभार्थ्यांच्या घरी जावून लसीबाबत योग्य माहिती देतील याचेही नियोजन करण्यात येईल. लसीकरणासाठी नियुक्त करण्यात येणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांनी जिल्ह्यात एकूण २ लाख १९ हजार ८६९ बालके पल्स पोलिओ लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यासाठी त्यांच्या लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे सविस्तर सादरीकरण केले.

error: Content is protected !!