तुका म्हणे : भाग : ५ : SWOT ANALYSIS

0 248

पोपट पकडण्यासाठी शिकारी नळीत ओवून दोन्ही झाडांना बांधतो व नळीला खाद्यपदार्थ बांधतो. ते खाण्यासाठी पोपट नळीवर बसतात. नळी उलटी फिरते व पोपट सुद्धा उलटा फिरतो. त्याला जमीन आकाश भासते व पाय सुटले तर आपण पडू, आपले तुकडे तुकडे होतील अशा भीतीने उडून जाण्याची सामर्थ्य असूनही केवळ भीतीपोटी तो स्थिर राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे कितीतरी जीव पशुप्रमाने आहेत. त्यांच्यापुढे काही चालत नाही.
शुके नळीकेशी गोवियेले पाय ! विसरोनी जाय पक्ष दोन्ही !!१!!
तुका म्हणे एक ऐसे पशू जीव ! न चले उपाव काहीं तेथें !!२!!

तुकोबारायांच्या उदाहरणातील पोपटा प्रमाणे आपण अनेक वेळा अडचणीत पडतो. आपण आपल्या स्व:मध्ये असलेल्या ताकतीवर बऱ्याच वेळा लक्षच देत नाही व आपण कमकुवत आहोत असे जाणून परिस्थिती आणखीनच बिकट करून घेतो. खरं पाहिले तर प्रत्येक परिस्थिती ही वाईटच नसते तर आपण परिस्थिती समोर हातपाय गाळून, आपली शक्ती पूर्णपणे न वापरता आपली अस्वस्थता वाढवत असतो. कोरोना कालखंडात अशी अनेक जण पाहण्यात आली जी खूपच अस्वस्थ होती.

परिस्थिती कशी ही असो , आपणास त्यावर मात करायची असेल तर आवश्यक आहे ” SWOT ANALYSIS ”

S – Strength
W – Weakness
O – Opportunity
T – Threat

(१) S – Strength : सामर्थ्य : प्रत्येक व्यकी हे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे , त्याप्रमाणे प्रत्येकाची बलस्थाने ही वेगळी असतात. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रथम आपणास आपली बलस्थाने संपूर्णतः माहीत असणे आवश्यक असते. कोणाचे सामर्थ्य शारीरिक असेल, तर कोणाचे बौद्धिक तर कोणी एखाद्या कलेत पारंगत असेल ई..
परंतु आपणास आपले सामर्थ्य माहीत असले पाहिजे तरच आपण योग्य वेळी योग्यतऱ्हेनं त्याचा उपयोग करू नाहीतर तुकोबांच्या ओवितील पोपटाप्रमाणे पंखात उडण्याचे सामर्थ्य असूनही भीतीपोटी योग्यवेळी वापरू शकणार नाही.

(२) W – Weakness – दुर्बलता :
जगातील कोणताही प्राणी संपूर्णतः परिपूर्ण नाही, प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते मग ती शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा माहितीमध्ये असेल ई..आपल्याला एखाद्या परिस्थितीस समोर जायचे असेल तर अत्यावश्यक आहे ते आपल्या दुर्बल घटकांना जाणून घेणे व त्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न करणे. आपण एखादी परिस्थिती बदलू शकत नसू तर आपल्यातील कमकुवत घटकांना मजबुती दिल्यास परिस्थिती सुधारणयासाठी बरीच मदत होते.
वरील तुकोबारायांच्या उदाहरणातील पोपटाची दुर्बलता त्याच्या मानसिकतेत दिसतो. भीतीवर मात न करू शकल्यामुळे तो सहजच शिकऱ्याच्या हाती सापडला.

आपले सामर्थ्य व आपल्या दुर्बलता या दोन आपल्या आंतरिक घटकांना जाणून घेऊन , बलस्थाने अधिकाधिक प्रबळ बनवणे व दुर्बल घटकांना सामर्थ्यशाली बनवण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही यशाचे मुळ होय.

(३) O – Opportunity : संधी :
आपण नेहेमी म्हणतो संधीचे सोने करणे. संधी हा एक बाह्य घटक आहे . परिस्थिती कितीही अंध: कारमय असो एकतरी संधीचा क्षण मिळतोच फक्त तो मिळवायचा प्रयत्न असला पाहिजे, हातपाय गाळून बसल्यास ती संधी आपणास दिसतही नाही व आपण फक्त नशिबाला दोष देतो.
आपण आपल्या सामर्थ्याकडे पाहिले पाहिजे , काही संधी मिळेल का ? तसेच आपल्या कमकुवत घटकांना दूर करण्याची संधी मिळते का ? हे आपण सतत पाहायला हवे. आणि नक्कीच काहीतरी संधी मिळतच असते.

(४) T – Threat : धोके :
आपले ध्येय साध्यकरण्याकरिता कोणते धोके अडसर येत आहेत याची जाणीव आपणास त्या धोक्यापासून दूर ठेवते व आपला ध्येय प्राप्तीचा मार्ग सुकर बनतो. त्यामुळे धोके या बाह्य घटकाचा सारासार विचार अवश्य करावा.

वरील उदारणातील पोपटास त्याच्या पंखातील सामर्थ्य कळले असते, भितिरुपी मानसिक कमतरतेवर तो मात करू शकला असता , उडून जाण्याची संधी त्यास समजली असती आणि शिकऱ्याच्या धोक्याचा विचार केला असता तर तो अडचणीत आला नसता. पोपटासारखी अवस्था टाळण्यासाठी आवश्यक आहे ते SWOT ANALYSIS

म्हणूनच तुकोबाराय म्हणतात

” शुके नळीकेशी गोवियेले पाय ! विसरोनी जाय पक्ष दोन्ही !! ”

लेखक-
डॉ.जगदिश ज्ञानोबाराव नाईक
मानसोपचार तज्ञ,परभणी

error: Content is protected !!