तुका म्हणे : भाग १० : भावना

0 48

एकदा शिष्य व गुरू प्रवासासाठी दूरदेशी निघाले होतो, वाटेत त्यांना एक पाथरवट मूर्ती बनवताना दिसला. मूर्तिकार दोन दगडांना आकार देण्यात मग्न होता , शिष्याने दोन्ही दगडाविषयी चौकशी केली, मुर्तीकाराने एक अमूल्य असल्याचे सांगितले कारण त्यापासून देवाची मूर्ती बनणार होती. शिष्य गुरूकडे जाऊन त्या दोन्ही दगडाच्या मूल्यांच्या फरकाबद्दल विचारले , त्यावर गुरू म्हणाले , ह्याचे उत्तर तुकाराम महाराजांनी देले आहे

तुका म्हणे,

पाषाण देव पाषाण पायरी ! पूजा एकावरी पाय ठेवी !!१!!
सार तो भाव सार तो भाव ! अनुभवी देव ते ची जाले !!२!!
उदका भिन्न पालट काई ! गंगा गोड येरा चवी काय नाहीं !!३!!
तुका म्हणे हे भाविकांचे वर्म ! येरी धर्माधर्म विचारावे !!४!!

तुकाराम महाराज म्हणतात, देव देखील पाषाणाचा आणि पायरी देखील पाषाणाची असते परंतु एकाची पूजा करतात आणि एकावर पाय ठेवतात. कारण एका पाषाणाची मूर्ती केलेली असते व त्याची श्रद्धायुक्त भावनेने प्राणप्रतिष्ठा केली जाते . म्हणजेच श्रद्धेची भावना ज्या पाषाणात अनुभवली त्यात देव अनुभवला. या पृथ्वीवर पाणी सर्वत्र सारखेच असते परंतु लोक असे म्हणतात गंगेला चव आहे , गंगा गोड आहे मग इतर पाण्यात चव नाही काय ? यामागील खरे कारण असे गंगेच्या पाण्यात पवित्रतेची भावना मिळाली व इतर पाण्याला नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्ती, घटना, गोष्ट, पदार्थ काहीही असो त्याची अनुभूती करून देणारी बाब म्हणजे त्याबद्दलची भावना.
कुठलाही प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे जेव्हा आपल्या शारीरिक बदल होतात तेव्हा आपण त्यांचा विचार करून आपल्या दृष्टीने त्यांचा अर्थ (इंटरप्रिटेशन) लावतो आणि त्यामुळे आपल्याला त्या भावना समजतात. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या लोकांची इंटरप्रिटेशन बदलत असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या भावना अनुभवायला मिळतात.
आपल्या मनात येणाऱ्या भावनांनापैकी काही मूळ किंवा प्राथमिक भावना (बेसिक इमोशन्स) असतात आणि बाकीच्या भावना त्यांच्यापासून आपल्याला मिळू किंवा समजू शकतात असं समजलं जातं. रेने देकार्त या सुप्रसिद्ध विचारवंताच्या म्हणण्यानुसार आपल्याला प्रेम, द्वेष, आश्चर्य ,मोह ,आनंद आणि दुःख अशा सहा प्रकारच्या भावना असतात.
भावनांविषयी चार्ल्स डार्विन, ड्युचेन, विलियम जेम्स, शॉक्टार – सिंगर, जेम्स लंगे इत्यादी शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले. त्यावरून भावनांचे उत्क्रांती विषयी काही अनुमान मांडण्यात आले आहेत. ज्याविषयी अनेकांचे वेगवेगळी मते आहेत. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की आपल्या काही मूळ म्हणजेच बेसिक इमोशनस असतात, त्यास नेचर (nature) कारणीभूत असतो, तर काही भावना अनुभवानुसार (nurture) प्राप्त होतात.

भावनांची उत्क्रांती :

१) आदिम भावना ( प्रिमिटिव्ह इमोशन्स ) : समजा जगातील सर्वात पहिला आदिमानव जंगलातून जाताना त्यास एक हिंस्त्र प्राणी दिसला , भावनांच्या शून्यतेमुळे त्यास काहीच अनुभव आला नाही. त्याच्यावर झालेल्या प्राण्याच्या हल्ल्यामुळे त्या सोबत असलेल्या इतर आदिमानवाच्या भावनांच्या उत्क्रांतीस प्रारंभ झाला असावा. जसे त्यांच्यामध्ये भीती, चिंता (फ्लाईट) ही भावना उत्पन्न झाली असावी. त्यासोबतच संताप , क्रौर्य ( फाईट ) अशा ही भावना अनुभवास आल्या असाव्या. म्हणजे सुरुवातीस फ्लाईट -फाईट हे मेकॅनिझम अनुभवले असावे. वैज्ञानिक प्रयोगानुसार आदिम भावना हायपोथँलामस, लिंबिक सिस्टिम, अमग्डला ई मेंदूतील भागात तयार होतात. या भावनांचे मुलतत्व प्रतिक्रिया (रिएक्शन) होय.

२) प्रगत भावना : मनुष्य प्रगत होत राहिला व भावनांचे उत्क्रांती होत गेली. भावनिक प्रगतीतून मनुष्य हा समाजशील प्राणी होत राहिला त्यास प्रेम , माया , नम्रता तसेच भीती, कमतरता , स्व:ताकद इत्यादी भावनांची जाण वाढीस लागली. यातून मनुष्य परस्परावलंबन (लिव्ह अँण्ड लेट लिव्ह) शिकला असावा. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या भावना सेरेब्रल कॉर्टेक्स या मेंदूच्या भागाच्या विकासामुळे वाढीस लागल्या. म्हणजेच मनुष्य प्रतिक्रिया या टप्प्यावरून प्रतिसाद या टप्प्याकडे वाटचाल करू लागला (रिअक्शन टू रिस्पॉन्स)

३) उन्नत भावना : मनुष्य आदिम भावनेतून उन्नत भावनेकडे प्रगती करू लागला. या भावना सुमारे चार ते पाच हजार वर्षापासून अनुभवास येतात. यामध्ये आस्था ,करुणा, तन्मयता , समर्पण , कृतज्ञता निरपेक्षता , क्षमा , संयम , सहिष्णुता, कैवल्य इत्यादी भावनांचा समावेश होतो. उन्नत भावना प्रामुख्याने निओकॉर्टेक्स या मेंदूतील भागात तयार होतात.

मनुष्याच्या सुरुवातीपासून आत्ताच्या प्रगतिपर्यंत तयार झालेल्या सर्व भावनांचा आपण उपयोग करत असतो. एखादी घटना घडल्यानंतर त्याबद्दल तयार झालेल्या भावनेवर आपले वर्तन ठरत असते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव गुणधर्मानुसार व अनुभवानुसार भावनांची भिन्नता अनुभवता येते.

घटना —> भावना —> वर्तन

त्यामुळे तुकोबाराय घटना घडते तेव्हा घटनेपेक्षा, व्यक्तीपेक्षा त्याबद्दल असलेल्या भावनेस अधिक महत्त्व देतात.

भावनांचा विस्तार :

१) स्वतःच्या भावनांची जाणीव व नियोजन : भावनांच्या विस्ताराची प्रथम पायरी म्हणजे आपल्या स्वतःच्या भावनांचे जाणीव करून घेणे व त्या भावनांचे रूपांतर कृतीमध्ये करण्यापूर्वी त्याचे योग्य नियोजन करणे म्हणजेच आपण विवेकी दृष्टिकोनातून विवेकी वर्तनास प्रवृत्त होऊ. जसे कोरोना होण्याच्या भीती या भावनेचे नियोजन केल्यास काळजी या भावनेतून आपण कोरोना या आजाराकडे पाहू ( भीती ते काळजी)

२) इतरांच्या भावनांची जाण व भान : भावनिक विस्ताराचा दुसरा टप्पा म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावनांची जाणीव करून घेणे. म्हणजेच आपण प्रतिक्रिया या टप्प्यावरून प्रतिसाद या टप्प्यावर जाऊ.

३) समष्टी भावनांची जाण : समष्टी म्हणजे एखाद्या समूहावर संकट ओढवल्यानंतर केली जाणारी प्रार्थना. समष्टी भावनांची जाण म्हणजे आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण. कोरोना कालखंडामध्ये ही भावना वाढीस लागल्याचे अनेक अनुभव आपणास आले आहेत.

म्हणजेच आपल्या भावनांचा विस्तार हा स्वतःच्या भावनांची जाण व नियोजनापासून चालू होऊन समष्टीच्या भावनेची जाण व भान या टप्प्यावर येऊन पोहचायला हवा.

म्हणूनच तुकोबाराय आपल्या भावनांना कसे जाणावे याचा परिपाक ओवीतून करून देतात तो असा

” पाषाण देव पाषाण पायरी! पूजा एकावरी पाय ठेवी !!
सार तो भाव सार तो भाव ! अनुभवी देव ते ची जाले !!”

डॉ. जगदिश नाईक
मानसोपचारतज्ञ
मन हॉस्पिटल परभणी
9422109200

error: Content is protected !!