तुका म्हणे : भाग ७ : आत्महत्या

0 102

एके दिवशी सकाळी ICU मधून फोन होता , सर एक पेशंट पहावयाचा आहे. मी हॉस्पिटल मध्ये गेलो, तिथे पाहिले तर एक २४ वर्षीय तरुण खूपच अस्वस्थ होता. संपूर्ण माहिती घेतल्यावर समजले त्याने ४ दिवसाखालीच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मी त्यास म्हटले ,” मी काही मदत करू शकतो का ? ” त्यावेळी तो म्हणाला , “सर मला खूप उदास होत आहे , कोरोनामुळे माझा व्यवसाय बुडाला , सर्व काही संपले, मला मरू द्या डॉक्टर.” मी काही बोलणार तेवढ्यात बाजूच्या बेडवरून ८० वर्षीय एक खेड्यातील बाबा म्हणाले,

तुका म्हणे ,

न लगे द्यावा जीव सहज चि जाणार ! आहे तो विचार जाणा काहीं !!१!!
मरण जो मागे गाढवाचा बाळ ! बोलिचे चांडाळ शुद्ध त्यासी !!२!!
तुका म्हणे कई होईल स्वहित ! निधान जो थीत टाकू पाहे !!३!!

ओवी बोलून झाल्यावर ते अर्थ सांगू लागले , तुकोबाराय म्हणतात, मुद्दाम जीव देण्याची गरज नाही तो एक दिवस जाणारच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा . जो देवाजवळ मरण मागतो तो निर्बुद्ध प्राण्यासारखा वागत असतो ,एवढेच नाही तर त्याचे ते वागणे दुष्कर्म ठरते. जो स्वतः मरण मागतो त्यास हे कसे कळत नाही की देहरूपी अमूल्य ठेवा जर तो राहिलाच नाही तर मेल्यानंतर काहीही आपले हित होणार नाही उलट जिवंत राहून आपण काहीतरी सत्कर्म करू.

तुकोबारायानी सांगितलेले आत्महत्येचे बोल आजही आपण जाणत नाही कारण आत्महत्या या विषयाची जागरूकता समाजात खूपच कमी आहे.

आत्महत्या विषयाची भीषणता :

जागतिक आरोग्य संघटनेची २०२० वर्षीची थीम ” आत्महत्या व आत्महत्या प्रतिबंधक उपाय” अशी होती. जरा विचार केल्यास का बरे आपल्या जागतिक आरोग्य संघटनेस या थीमवर भर द्यावा असे वाटले? तर त्याचे उत्तर म्हणजे जगात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्यांनी मरतात. म्हणजेच जगात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते . तज्ञांच्या मताप्रमाणे अनेक आत्महत्या या आत्महत्या म्हणून नोंदवल्या जात नाहीत. आत्महत्येचे खरे प्रमाण हे माहीत असलेल्या आकडेवारीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. यात आत्महत्येने होणाऱ्या मृत्यूची नोंद आहे पण आत्महत्येचे प्रयत्न केले, मात्र त्यांचा जीव वाचला अशांचा समावेश नाही. अशी आकडेवारी एकत्र केली तर आत्महत्येचा विषय खूपच गहन व संवेदनशील आहे. एका आकडेवारीनुसार २०१४ सालचा भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा ५६५० एवढा होता.
सर्वात चिंतेची बाब म्हणजे , या सर्व आकडेवारी मध्ये १५ – ३९ या वयातील तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे व या वयोगटातील आत्महत्या हे मृत्यूचे एक नंबरचे कारण आहे. विशेष म्हणजे ८०% आत्महत्या करणारे लोक साक्षर होते.
वर्ष २०१६ आकडेवारीनुसार भारतात २ लाख ३० हजार ३१४ आत्महत्या झाल्या, हा जगातील आत्महत्येच्या १७ % वाटा आहे.

आत्महत्येची कारणे :

१) मानसिक आजार : झपाट्याने बदलत चाललेल्या चंगळवादी जगात मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यातून येणाऱ्या नैराश्यामुळे अनेक आत्महत्या होतात. तसेच इतर मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया , बायपोलर डीसऑर्डर, व्यसनाधीनता ई. मानसिक आजारामुळे देखील आत्महत्या होत असतात.
२) सामाजिक कारणे : समाजजीवनात तयार होणाऱ्या ताण तणावा मुळे अनेक आत्महत्या होतात. वैवाहिक जीवनातील अडचणी, हुंडाबळी , परीक्षेचा ताण,परीक्षेतील अपयश ,प्रिय व्यक्तीचा मृत्यू , प्रेमभंग होणे , मोबाईल गेमचा अतिरेक ,नोकरी जाणे , किंवा नोकरीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याचा त्रास , ही काही कारणे असू शकतात.
३) आर्थिक कारणे : आर्थिक असमतोलामुळे आजच्या चंगळवादी जगात ताण तणाव वाढून व्यवसायिकापासून ते शेतकऱ्यांपर्यंत आत्महत्या वाढल्या आहेत. कोरोणा सारख्या संकटात आर्थिक अडचणींना सामोरे जाताना नैराश्‍य येऊन अनेक आत्महत्या होत आहेत. डोक्यावरील कर्ज , आर्थिक चणचण , बेरोजगारी मुळे सुद्धा आत्महत्या होत आहेत .
४) मेंदूतील रासायनिक बदल : वैज्ञानिक संशोधनानुसार असे लक्षात येते की मेंदूतील जैवरासायनिक बदलामुळे जसे सेरोटोनिन नावाचे मेंदूतील केमिकल कमी झाल्यामुळे नैराश्य येऊन आत्महत्येचे विचार येतात.

आत्महत्या टाळता येऊ शकतात का ?

आपण सर्वजण अनेक रोगांबाबत संवेदनशील असतो. जसे मागील काही वर्षापासून कोरोना ची साथ आल्यानंतर आपण अनेक काळजी घेतल्या. परंतु आत्महत्यांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा नंबर लागत असताना देखील याकडे पूर्णपणे डोळेझाक करतो. संवेदनशीलपणे या विषयाकडे पाहिल्यास यातील अनेक आत्महत्या १०० % टाळू शकतो.
(१) आत्महत्या करणारी व्यक्ती बऱ्याच वेळा तसे संकेत देते परंतु कुटुंबीयांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. हे लक्षात ठेवून त्यांना मदत केल्यास आत्महत्या टळू शकते.
आत्महत्या करणारी व्यक्ती कुणा न कुणा जवळ मला जगण्यात रस वाटत नाही ,असे नाकारात्मक बोल बोललेला असतो .
(२) अनेकवेळा असे गृहीत धरले जाते की आत्महत्या करणारी व्यक्ती मनाने कमकुवत असतात. परंतु आत्महत्या हा एक मानसिक आजाराचे लक्षण आहे, यास कोणीही बळी पडू शकतो कारण प्रथमत: तो एक व्यक्ती आहे. याचीच उदाहरणे म्हणजे एखादा प्रसिद्ध सिनेअभिनेता असेल, एखादे महाराज किंवा प्रसिद्ध कंपनीचा मालक.
(३) नैराश्य , सिझोफ्रेनिया , बायपोलार डिसऑर्डर, व्यसनाधिनता ई. मानसिक आजाराचा उपचार योग्य वेळी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने केल्यास आत्महत्येचे प्रमाण बरेचसे घडू शकते.
(४) औषधोपचार , समुपदेशन , गरज असल्यास ECT उपयोग
(५) सर्वात महत्त्वाचे योग्य वेळी मदतीचा हात देणे गरजेचे ठरते . जर एखादी व्यक्ति जीवना विषयी , जगण्या विषयी नाकारात्मक बोलत असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत किंवा समुपदेशकाची मदत घ्यावी.
(६) याविषयी समाज प्रबोधन आवश्यक आहे, १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून संबोधण्यात येतो. अश्या विषयावर प्रबोधन करणारे कार्यक्रम राबवता येतील .

तुकोबारायांना या विषयाची भीषणता त्याकाळी जाणवली होती म्हणूनच तुकोबाराय म्हणतात
” न लगे द्यावा जीव सहज चि जाणार ! आहे तो विचार जाणा काहीं !! ”

डॉ. जगदिश नाईक
मानसोपारतज्ज्ञ , परभणी

error: Content is protected !!