आ.डॉ.राहुल पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट-सोयाबीन साठा करण्याची मर्यादा वाढवण्याची केली मागणी

0 67

परभणी,दि 20 (प्रतिनिधी) ः
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सोयाबीन आणि डाळीचा साठा करण्याची मर्यादा वाढवावी, अशी मागणी परभणीचे शिवसेना आ.डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आ.डॉ. राहुल पाटील यांनी २० ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. परभणी जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरपैक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली.परंतु मागील महीण्यात झालेल्या आतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उतार्यात कमालीची घट झाली आहे.खरीप हंगामातील सोयाबीन आता बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे; परंतु शेतमाल बाजारपेठेत विक्रीस येताच दर घसरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सोयाबीन व तुर यांची राज्यातील साठा मर्यादा वाढविल्यास शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अपेक्षित भाव मिळणे शक्य होईल. पूर्वी ११ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेलेला भाव सध्या मात्र मोठ्या प्रमाणात घसरला आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. साठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. अशा वेळी सोयाबीन आणि तुरीच्या पिकाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना आर्थिक उभारी मिळू शकते. त्यामुळे साठ्याची मर्यादा वाढविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे आवश्यक आहे त्यासाठी ठाकरे सरकारने पुढाकार घ्यावा. आगामी काळात तूरही विक्रीसाठी बाजारपेठेत येणार आहे. त्यामुळे शासनाने आधी खरेदी केंद्र अद्यावत करावेत, जिल्ह्यात काट्यांची संख्या वाढवावी, पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध करून द्यावा, शासकीय खरेदी केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची समिती गठीत करावी, अशी मागणीही आ.डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

error: Content is protected !!