सेलू / नारायण पाटील – गेल्या महिनाभरापासून सर्व्हर व नेटवर्क नसल्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडील ई-पॉस मशिन बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे मशिनद्वारे धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाल्यामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत, तर धान्य मिळत नसल्याने लाभार्थी वैतागून संताप व्यक्त करीत आहेत.त्यामुळे बरेच वेळा रास्त भाव दुकानदार व ग्राहकात वाद निर्माण होत आहेत .
सर्व्हरचे काम चालू असल्यामुळे व ई पॉस मशीन बंद असल्यामुळे अन्न धान्य वितरण करतांना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी ,परभणी यांच्या कडे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय चयस लाभार्थ्याचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरीता रास्तभाव दुकानांमध्ये ४ जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत. परंतु काही दिवसापासून ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करतांना तांत्रिक अडचणी येत आहेत. ही तांत्रिक समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
परंतु या गोंधळामुळे शिधापत्रिका धारकांना धान्य मिळत नसल्यामुळे त्यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . याबाबत गजानन इनामदार ,नायब तहसीलदार ( पुरवठा) यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता राज्यात एनआयसीचे काम चालू असून त्यामुळे सर्व्हर बरोबर चालत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे .परंतु यामुळे कोणताच लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही .जरी सर्व्हर उशिरा चालू झाले तरी लाभार्थ्याचे शिल्लक राहिलेले धान्य पुढील महिन्यातील धान्यासोबत वाटप करण्यात येणार आहे .त्यामुळे लाभार्थ्यांनी काळजी करू नये व दुकांदाराशी वाद घालू नयेत .