प्रत्येक दिवस हा देशभक्ती सिद्ध करण्याचाच असतो-प्रवीण कुमार

प्राप्तिकर विभाग आणि सिम्बॉयसिसच्या संयुक्त विद्यमाने पार पडला 'आझादी का अमृत महोत्सव

0 78

 

पुणे ,दि 26 ः
देशभरामध्ये उत्साहात आणि आनंदात ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य मिळविण्याकरिता आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते आबाधित राखण्याकरिता शेकडो देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत ‘आजादी का अमृत महोत्सव’ देशभरामध्ये साजरा केला जाणार आहे. केवळ एका दिवसापुरता हा महोत्सव साजरा न करता आपल्या मनामध्ये देशभक्तीची ज्योत अखंड तेवत ठेवली पाहिजे. आपआपल्या परीने देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देणे आवश्यक असल्याचे मत प्राप्तिकर विभागाचे पुण्याचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त प्रवीण कुमार यांनी व्यक्त केले.

प्राप्तिकर विभाग पुणे युनिटने सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस आणि वादविवाद स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी, सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉ. एस. बी. मुजुमदार, मुख्य आयकर आयुक्त (ठाणे) यशवंत चव्हाण, मुख्य आयकर आयुक्त (पुणे) एस. के. सिंग, महासंचालक (पुणे) संजय कुमार आणि संजीवनी मुजुमदार उपस्थित होत्या.

25 ऑगस्ट 2022 रोजी सिम्बायोसिस विश्वभवन येथे आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस आणि वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 26 ऑगस्ट 2022 शुक्रवार रोजी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे कॅम्पस येथे आयोजित करण्यात आला होता.  यावेळी बोलताना प्रवीण कुमार यांनी आपल्या भाषणात आझादी का अमृत महोत्सवाची पार्श्वभूमी सांगतानाच सीसीआयटी पुणे यांनी राबविलेल्या सायक्लोथॉन, आउटरीच कार्यक्रम, वृक्षारोपण मोहीम, लसीकरण शिबिरे आदी विविध कार्यक्रमाची माहिती दिली.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक- अध्यक्ष तथा कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या गरजेवर भर दिला.

error: Content is protected !!