गोंदेगाव सैनिकांचे गाव, फलकावर झळकले त्यांचे नाव
रामभाऊ आवारे
निफाड,दि 29 ःदेशसेवेसाठी युवकांना प्रेरित करणे,सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गोंदेगाव ग्रामपंचायत कार्यालयात लष्करी सेवा बजावणाऱ्या युवकांची निफाड तालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचायतीच्या फलकावर नावे झळकली आहेत.
सैन्यदलात भरती होऊन भारतमातेची सेवा करण्याचे स्वप्न न बघणारा एकही तरुण ग्रामीण भागात शोधून सापडणार नाही. स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी जिवापाड मेहनत करण्याची तयारी अनेक तरुणांची असते. मनात घेतलेली जिद्द पूर्णत्वात आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे तरुण कमी नाहीत. त्या मेहनतीला खतपाणी घालण्याचे काम गोंदेगाव ग्रामपंचायतने केले आहे. आजवर सैन्यदलात भरती झालेल्या तानाजी बाबुराव भोसले, संतोष माधव वैराळ, देविदास दत्तू साळवे, प्रकाश शांताराम साळवे, अरुण साहेबराव साळवे, संदीप चंद्रभान वाघ, भरत रत्नाकर कदम, मनोज तुकाराम केदार, ज्ञानेश्वर वाळूबा भोसले, विजय किसन सांगळे, संतोष रामदास साळवे, अमोल काकासाहेब रणशूर, ज्ञानेश्वर गणपत कदम, मनोज वाल्मिक जगदाळे, सचिन भिकाजी कापडी, मंगेश पोपट कांगणे, सागर दिलीप सानप यांची नावे या फलकावर झळकली आहेत. यातील तानाजी बाबुराव भोसले हे लष्करी सेवेतून निवृत्त होऊन सध्या पोलीस दलात सेवा बजावत आहेत. तर, विजय किसन सांगळे हे अग्निशामक दलात कार्यरत आहेत. उर्वरित जवान लष्करी सेवेत आहेत. या सतरा जवानांची नावे गोंदेगाव गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच कक्षात झळकल्याने विविध दाखले आणि उतारे घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष आपोआप या फलकाकडे जाते आहे. आपले नाव देखील या फलकावर झळकावे यासाठी गावातील तरुण भरती होण्याची खूणगाठ मनाशी बांधत आहेत. सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना या फलकाकडे बघून स्फूर्ती येऊन ते अधिक जोमाने भरतीसाठी प्रयत्न करतील हे नक्की आहे. युवकांना प्रेरित करण्यासाठी लष्करी सेवेत असलेले जवानांचे नामफलक झलकविलेली गोंदेगाव ग्रामपंचायत तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत