लाडक्या बहिणींना खुशखबर..पैसै जमा होण्यास सुरुवात..मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहीती

0 109

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम पुन्हा जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील निधी आचारसंहितेमुळे अडकला होता. परंतु, आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली असून आजपासून पात्र महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

१२ लाख ८७ हजार बहिणींच्या खात्यात या योजनेआंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसंच, आधार प्रमाणिकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले, त्यांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मंत्री अदिती तटकरे यांची पोस्ट
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार?

विविध तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना अर्ज करता आलेला नाही. त्यामुळे नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जातोय. त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “नोंदणी करण्याची शेवटची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत होती. तोपर्यंत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली आहे. अद्याप पुन्हा नोंदणी सुरू करण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. पात्र महिलांपर्यंत सध्या आम्ही सन्माननिधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

अर्जांची पुन्हा छाननी होणार?

दरम्यान, या योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी होणार का? यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “यासंदर्भातील भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. याबाबतची पुनर्पडताळणी करण्यात येईल. तक्रारी आल्या असतील तर योग्यपद्धतीने तपासून घेतल्या जातील. सरसकट पुनर्पडताळणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. निकषही बदलले नाहीत.”

error: Content is protected !!