ग्रामस्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा – सीईओ रश्मी खांडेकर

0 22

परभणी :- दि. 7 नोव्हेंबर
आपल्या गावाला स्वच्छ ठेवण्यासाठी व गावाचा सन्मान वाढविण्यासाठी शासनाच्या संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी रश्मी खांडेकर यांनी केले आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर अभियानात सहभाग नोंदविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, घर – गाव आणि परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता इत्यादी निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

ग्रामस्वच्छता अभियानाची अशी असेल निवड प्रक्रिया
जिल्हा परिषद गटात सहभागासाठी ग्रामपंचायत स्तरावरील समिती स्वयंमूल्यमापन अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करेल. तालुकास्तरावरील प्राथमिक समिती जिल्हा परिषद सर्कल मधून २ ग्रामपंचायतींची निवड करेल. तर अंतिम समिती जिल्हा परिषद सर्कल मधून एका ग्रामपंचायतीची निवड करेल. तसेच जिल्हा स्तरावरील समिती अधिक गुणानुक्रम असलेल्या १ ते ९ ग्रामपंचायतीची तपासणी करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय ग्रामपंचायतीची निवड करून तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार दिले जातील. जिल्हा स्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची तपासणी विभागस्तरावरील समिती करेल.

ग्रामपंचायतींना लाखांची बक्षिसे
जिल्हा परिषद गट प्रथम क्रमांक ६० हजार रुपये, जिल्हास्तर प्रथम क्रमांक ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांक ४ लाख रुपये, तृतीय क्रमांक ३ लाख रुपये, विभागस्तर प्रथम क्रमांक १२ लाख रुपये, द्वितीय क्रमांक ९ लाख रुपये, तृतीय क्रमांक ७ लाख रुपये, राज्यस्तर प्रथम क्रमांक ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांक ३५ लाख रुपये, तृतीय क्रमांक ३० लाख रुपये याशिवाय जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायती वगळून इतर संबंधित ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.

असे असतील विशेष पुरस्कार
वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन जिल्हास्तर ५० हजार रुपये, विभागस्तर ७५ हजार रुपये तर राज्यस्तरावर ३ लाख रुपये असे विषेश पुरस्कार दिले जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन जिल्हास्तर ५० हजार रुपये, विभागस्तर ७५ हजार रुपये तर राज्यस्तरावर ३ लाख रुपये देण्यात येणार आहे. तसेच स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय व्यवस्थापन साठी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर इतर महत्वाच्या बाबीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

तेव्हा आपल्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी योग्य ते नियोजन करून संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी रश्मी खांडेकर, स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी केले आहे.

error: Content is protected !!