चीनमध्ये कहर, त्याच व्हेरिएंटचा पहिला रूग्ण गुजरातमध्ये

0 357

करोनाचा त्रास जगातल्या काही देशांना भेडसावू लागला आहे. चीनमध्ये करोना व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BF7 ने हाहाकार माजवला आहे. या व्हेरिएंटचे रूग्ण चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. अशात याच व्हेरिएंटचा एक रूग्ण गुजरातच्या बडोदा या ठिकाणी आढळला आहे. गुजरातच्या बडोदा या शहरात BF7 या व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गुजरातमध्ये BF7 चे दोन रूग्ण?
गुजरातमध्ये BF7 या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळल्याची चर्चा आहे. अशात एक प्रकरण कन्फर्म झालं आहे. एक NRI महिला या व्हेरिएंटने संक्रमित झाली आहे. गुजरातमध्ये या व्हेरिएंटचा रूग्ण आढळण्याच्या आधी BF7 चे इतर रूग्णही आढळले आहेत. ऑक्टोबर महिन्यातही एक रूग्ण आढळला होता. मात्र चीनमध्ये या व्हेरिएंटने कहर माजवला असताना गुजरातमध्ये एक रूग्ण आढळल्याची बातमी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आजच बोलावली होती बैठक
भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आजच यासंदर्भातली बैठक बोलावली होती. या बैठकीत करोनाच्या देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत हा निर्णयही घेण्यात आला की आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. देशात कोरोनाच्या चाचण्या योग्य प्रमाणात केल्या जात आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणावर बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे.

मास्क सक्तीची चर्चा
मनसुख मांडवीय यांनी आज झालेल्या बैठकीची माहिती ट्विट करून दिली आहे. तर दुसरीकडे त्यांनी मास्क आवश्यक असल्याचं म्हटलं आहे त्यावरून देशात पुन्हा मास्क सक्ती होणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

मनसुख मांडवीय यांनी असं म्हटलं आहे की जगातल्या अनेक देशांमध्ये करोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना संपलेला नाही, आम्ही सर्वांना सतर्क राहण्यच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत. यानंतर नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी कोरोनाबाबत माहिती देताना हे लसीकरणावर भर दिला आहे. फक्त २८ टक्के नागरिकांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची जास्त गरज असल्याचं पॉल यांनी बोलून दाखवलं.

error: Content is protected !!