राजकीय बंधुत्वाचे वारसदार….

0 17

 

                         (१६ ऑगस्ट ‘ जयंतीदिन’ अनुषंगाने आबांच्या अनुभवांची साक्ष…)
परभणीचे धडपडे वकील कै . विष्णू नवले – पाटील यांनी परभणीमध्ये ‘मराठवाडा सांस्कृतिक मेळा ‘ आयोजित केला . त्यांना राजकारणाचा खानदानी गंध नव्हता पण राजकारणात ज्यांनी ‘ स्वच्छतेचा सुगंध ‘ निर्माण केला त्या आर. आर. आबांविषयी अपार आदर होता . त्यांनी थेट आबांशी संपर्क केला . ‘सांस्कृतिक मेळा ‘ उद्‌घाटनाचे प्रमुख म्हणून त्यांना परभणीमध्ये बोलावले. त्यावेळी आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते . ते त्यांच्या एका भ्रमणध्वनीवर परभणीत आले . ‘ सांस्कृतिक मेळा’ उदघाटनात ते जे बोलले ते राजकीय माणसांची सांस्कृतिक समज वाढवणारे बोल त्यांचे ‘ सांस्कृतिक संचित’ ठरलेले आहे. ‘ ‘ राजकारणात नकला करण्यापेक्षा जीवनात एखादी तरी कला राजकीय धुरिणांनी बाळगली तर माणुसकी आणि सुसंस्कृतपणा वाढतो . ही राजकीय संस्कृती राजकारणाचा पाया आणि वैभव आहे.” राजकारणात सदा न् कदा वैभव मिळवण्यापायी ज्यांनी ज्यांनी आपला आणि समाजातल्या चांगुलपणाचा पाया ढिल्ला करून राजकारणालाच अवकळा आणली, अशावेळी आबांचे विचार आधारभूत वाटतात. आज देशाचे प्रधानसेवक ‘आपली नवीन राजकीय संस्कृती’ आणण्यासाठी झटताना आबांनी जयप्रकाश नारायण ,यशवंतराव चव्हाण व अटलबिहारी बाजपेयी यांनी निर्माण केलेली ‘भारतीय राजकीय संस्कृती’ पुढे नेण्याचा घेतलेला वसा प्रभावशाली आणि परिणामकारक होता .
वसंतदादा पाटील यांचे बोट धरून राजकीच वाटचाल प्रारंभ करणारे आबा शरद पवारांचे विश्वासू आणि महाराष्ट्राच्या व राष्ट्राच्या राजकारणाचा ‘स्वच्छ आरसा ‘ ठरलेले होते. आबांनी पोलीस दलात स्वतःच्या दरार्‍यापेक्षा आदर निर्माण केलेला होता . ‘स्वच्छतेचा पदर’ स्वतः सांभाळत स्वच्छ राजकीय सेवा ते करत. त्यामुळेच तर ते ‘युनो’त आणि विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि स्वतः सोनिया गांधी यांच्या मनातील ‘राजकीय शुद्ध माणूस’ होते. जनतेचा आणि शेतकऱ्यांचा ते ‘हक्काचा विश्वासू मित्र’ होते . आपल्या लहानपणी परिस्थितीमुळे वडिलांचे जुने कपडे बदल करून वापरणारे आबा राजकारणात मोठे झाल्यावर आपले पांढरे साधे कपडे जनतेने आणि विरोधकांनी आरोप करून उतरवू नयेत म्हणून स्वतः ला जपत राहिले. त्यांच्या राजकीय कारकीर्दित एकही आरोप त्यांच्यावर झालेला नाही .अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांचे आवडते आबा होते .त्यामुळे आबा ‘राजकीय आदर्श’ ठरलेले आहेत .
राजकीय नीतिमत्ता, गुणग्राहकता, सत्यता, जनतेचा विश्वास आणि विकासाचे सहकार्य या पंचस्व गुणांनी ते स्वतःला आणि राजकारणाला सावरत राहिले. विरोधकांनाही त्यांचा आदर आणि आधार वाटत असे .त्यांचा दाखला स्वतः मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाणांनी दिलेला होता. बाळासाहेब ठाकरेंना आबा जेव्हा स्वतः भेटले त्यावेळी ते थोर कलावंत भारावून गेले. आबांना त्यांनी ‘राजकीय कलावंत’ ही उपाधी दिली. सहकार्याचे वचन दिले आणि वचन दिले – सहकार्यही केले. या राजकीय संगमामुळे महाराष्ट्राचे थोडेफार भलेही झाले. प्रत्येकाला वाटे ‘आबा आपला माणूस’. निर्मळपणा आणि संतांसारखी सत्यवाणी या सदगुणांनी आबा मोठे झाले आणि सदैव मोठे राहतील. आबा ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावात हक्काची आणि जिव्हाळ्याची माणसं आयुष्यात कमावली. उत्तम कांबळे , प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, इंद्रजीत भालेराव यांच्यासह प्राचार्य राम शेवाळकर यांच्याशी मनातून उकलत साहित्याच्या अनुबंधातून स्वतःच्या विचारांची मशागत करण्यासाठी त्यांनी वाचनाचा नाद पिच्छा करून पुरवला. कुठल्याही अप्रतिम कलावंताला दाद दयावी ती आबांनीच आणि कुठल्याही कलावंताला अप्रतिम दाद वाटावी ती ही आबांचीच !
अंजनीला गावाकडे काय किंवा कुठेही असतील तर मंत्री म्हणून संरक्षणाचा – सुरक्षेचा प्रोटोकॉल पोलीस यंत्रणा पाळत असे पण आबा स्वतःभोवती माणसांचा गराडा आणि बाजूला पोलिसांचा राबता ठेवायचे . कितीही गर्दीत बसलेले असले आणि दर्दी माणूस दिसला की, कार्यकर्ता दिसला की ,प्रोटोकॉल सारून समोरच्याच्या नजरेला नजर देत ते त्याला जवळ बोलावत ,गप्पा मारत. कामाची पूर्तता करत. ‘गोड बोलून बोळवण करणारे’ ते नव्हते . माझा खुद्द अनुभव त्यांच्याविषयीचा तसा आहे . मी आबांच्या गावाजवळील संदीप शिसाळ यांचे शेळीपालन बघायला परभणी जिल्हयातील आठ ते दहा शेतकरीबंधू घेऊन गेलो. सहज अंजनीजवळ गेलो तर सुट्टीचा दिवस म्हणून आबा गावाकडे आलेले. त्यांच्या घरी एका खोलीत पाचशे लोकांच्या गराड्यात सतरंजीवर बसून वार्तालाप करत होते .बाजूला व बाहेर पोलिसांचा ताफा . परभणीला इंद्रजीत भालेराव गुरुजींच्या घरी आल्यानंतर त्यांची पक्की ओळख झालेली होती. त्यामुळे त्यांच्या घरी मला पोलिसांनी अडवले नाही .आमची नजरानजर झाली अन् ते थेट त्यांचे धाकटे बंधू सुरेश पाटील यांना म्हणाले ,’ या परभणीच्या पाहुण्यांना बैठकीत बसवा, मी आलोच ‘. लोकं पांगले . ते आमच्या जवळ येऊन बसले .शेती-शेळीपालनाची साधकबाधक चर्चा केली . तर असे हे दिलदार आबा त्या वेळचे गृहमंत्री. मी परतताना पोलिसांनी मला विचारले ‘तुमचे अन आबांचे काय? ‘ मी म्हणालो, ‘मनातली ओढ अन् भेट गोड’. टेन्शनमधले पोलीसही मनातून हसले .
राजकीय मैदानात राजकारणी सदैव बाह्यचेहरा आणि अंतर्मुख चेहरा याची सरमिसळ करून जगतात. पण आबांचा चेहरा जे मनात तेच जनात पाहण्याचा होता. म्हणून तर ते जनतेचे आणि जनता त्यांची होती .परभणी जिल्हयातील मानवत यथे प्रचार सभेला आबा स्टार प्रचारक म्हणून आलेले .आबा भाषणाला उभे राहिले अन् शब्दशः बदाबदा पाऊस पडायला लागला. आबा आणि ऐकणारे पावसात चिंब झालेले पण पाऊण तासाचे भाषण ऐकून आबांना प्रतिसाद देणारी जनता महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रांची महत्वाची बातमी झालेली. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी निधीचा विधीपूर्वक वापर केला. तंटामुक्ती व स्वच्छ गावाच्या पुरस्कारांनी गावोच्या गावं अभिमान व समाधानाने बहरली . बहरात आलेले डान्सबार जागेवर सुकले. पण कित्येक आयाबायांचे आयुष्य फुलले .पोलीस खात्यातील शेष निधीतून विधायक कामांसाठी ते सतत प्रयत्नशील होते. वसंतराव नाईक यांच्या काळात पोलिसांना खाकी हाप चड्डी ऐवजी फुलपॅन्ट आली. त्या वर्दीला आबांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात इज्जत आली .गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या आबांनी तेथील स्थानिक तरुणांना नक्षलवादी बनण्याचे सोडून पोलीस खात्यात नौकरीला प्राधान्य दिले . आपल्या आबासाहेबांशी झटण्यासाठी नौकरशाहीही आनंदात होती. पोलीसदलात आबांच्या काळात ‘ आदर-कदर’ चा आनंद होता. भरतीत गुणांची पारख व्हायची. गुणी माणसं पोलिसात आली, ती आबांमुळेच . राजकारणाकडे गुणीजनांची मांदियाळी म्हणून बघण्यासाठी आबा सदैव जागरूक राहिले. सहकारी-विरोधक यांना सोबत घेऊन राजकीय बंधुत्वाचा वारसदार म्हणून आबा मार्गक्रमण करायचे. वाचनाची बैठक आणि वागण्याचा वस्तुपाठ याची सांगड घालून आपल्या कार्याने ‘कीर्ती उज्ज्वल’ करणारे आबा सभागृहात आणि जनतेत ‘ सर्वोत्तम लक्षवेधीकार ‘ ठरलेले आहेत. लोक त्यांना ‘आधुनिक गाडगेबाबा -आबा’ म्हणायचे. आबांनी असे बरेच काही अलौकिकाला साजेसे कमावलेले आहे.१६ ऑगस्टला( जयंतीदिन ) परभणीला त्यांच्या विचारांचा ‘आबा महोत्सव’ पार पडलेला आहे. त्यांचे विचार आणि त्यांच्यावरील इतरांचे लेखन याचा आपण आत्मविचार करतोय .आपल्या तर्फे आबांना कार्यसलाम !

अरुण चव्हाळ,
अध्यक्ष, रानमेवा शेती-साहित्य मित्रमंडळ, परभणी .
संपर्क – ७७७५८४१४२४

error: Content is protected !!