तुम्ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?, उद्धव ठाकरे म्हणतात…

0 69

मुलाखतीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?, असा प्रश्न विचारला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेने उठाव केला असता. तसं झालं नाही, असंही अधोरेखित केलंय. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानाने सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं; असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

 

– मुळातच माझी ‘वर्षा’वर जाण्याची इच्छा होती का? याचं उत्तर सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ आता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून वाईट बोलतोय असं मुळीच नाही. ते एक वैभव आहे. मुख्यमंत्रीपदाचा आणि ‘वर्षा’चा मी अजिबात अनादर करणार नाही. ती एक वेगळी वैभवशाली वास्तू आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे एक वैभवशाली पद आहे, जबाबदारीचं पद आहे. त्याचा पूर्ण आदर ठेवून सांगतो, मी कधीच वैयक्तिक अशी स्वप्ने बघितली नव्हती. त्यावेळी जे घडलं ते आजच्या लोकांना ज्यांना आपण विश्वासघातकी म्हणू, त्यांना ते पूर्ण माहितेय की कसा पाठीत वार केला गेला आणि कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला होता.

 

तुम्ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं, हिंदुत्व संकटात आलं अशी जी आवई उठवली जातेय…
– म्हणजे काय?… मला एक प्रसंग असा दाखवा किंवा माझ्या हातून घडलेली एखादी गोष्ट अथवा मुख्यमंत्रीपदावर असतानाचा एखादा निर्णय सांगा की, ज्याच्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं. एक निर्णय दाखवा. अयोध्येला तर तुम्ही आतासुद्धा गेला होतात. अयोध्येमध्ये आपण महाराष्ट्र भवन उभं करतो आहोत. बरोबर आहे? हे हिंदुत्वाला सोडून आहे का? तुम्हीच ठरवा. मुख्यमंत्री होण्याआधी मी अयोध्येत गेलो होतो. प्रत्येक वेळी आपण होतात. मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा अयोध्येत गेलो होतो. कोण काय म्हणेल याची मी पर्वा केली नाही. मी गेलो आणि रामलल्लाचं दर्शन घेऊन तेव्हाही आलो होतो. दोनदा मी स्वतः अयोध्येत गेलो होतो. आता नवी मुंबईत आपण तिरुपती मंदिरासाठी जागा दिली. जी प्राचीन मंदिरं आहेत त्यांचं संवर्धन करणं, जतन करणं हे आपण सुरू केलं. गडकिल्ल्यांचं संवर्धन आपण सुरू केलं. यात हिंदुत्व गेलं कुठे? आपण हिंदुत्वापासून दूर गेलो असा कोणताही निर्णय केला नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

error: Content is protected !!