मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष-सोनिया गांधींनी शंका घेणाऱ्यांना ठणकावले

0 186

शब्दराज ऑनलाईन,दि 16ः
मीच काँग्रेसची फुल टाइम अध्यक्ष असल्याचा स्पष्ट संदेश सोनिया गांधींनी शनिवारी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिला आहे. गेल्या वर्षी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी (G-23) सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज असल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावरूनच कुणाचेही नाव न घेता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षातील नेत्यांना हा संदेश दिला. सोबतच, जे काही बोलायचे असेल तर स्पष्ट माझ्याशी बोला मीडियाच्या माध्यमातून नको असेही सोनिया गांधींनी ठणकावले आहे.

स्वतःवर नियंत्रण, शिस्त तेवढेच महत्वाचे

काँग्रेसमध्ये होणाऱ्या संघटनात्मक बदलावांची प्रक्रिया सुरू असून वेणुगोपाल याची सविस्तर माहिती देतील असेही सोनिया गांधींनीनी सांगितले. काँग्रेस पूर्ण ताकदीने पुन्हा उभी व्हावी असे सर्वांना वाटते. परंतु, यासाठी एकता आणि पार्टीच्या हितांना प्राधान्य देण्याची गरज आहे. यापेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे, स्वतःवर नियंत्रण आणि शिस्तबद्धता आहे असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या.

गतवर्षी लिहिले होते पत्र

उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेसच्या G-23 नेत्यांनी गतवर्षी सोनिया गांधींना एक पत्र पाठवले होते. यामध्ये पक्षात मोठे बदल आणि नेतृत्वाची गरज व्यक्त केली होती. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. अगदी खालच्या स्तरापर्यंत काँग्रेसमध्ये बदल होणे आवश्यक आहे. अन्यथा काँग्रेसच्या प्रगतीचा आलेख ढासळत राहील असा इशाराही या नेत्यांनी दिला होता. पक्षाला पंजाबसह छत्तीसगडमध्ये सुद्धा समस्या येत असल्याची खंत या नेत्यांनी व्यक्त केली होती.

अंतर्गत मतभेद काँग्रेससाठी आव्हान

काँग्रेस कार्य समितीच्या आजच्या बैठकीत पक्षांतर्गत शिस्त आणि त्यासंबंधित मुद्दे महत्वाचा विषय आहेत. सोबतच, पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकींवर रणनिती आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक या बैठकीतील इतर महत्वाचे मुद्दे आहेत. काँग्रेसला गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत मतभेदांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच, राहुल गांधी यांचे सर्वात जवळचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या भविष्याची चिंता आहे. तर दुसरीकडे, राजस्थानमध्ये सत्ता असली तरीही मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समन्वय प्रस्थापित करणे काँग्रेससाठी आव्हान ठरत आहे.

18 महिन्यानंतर ऑफलाईन बैठक

तब्बल 18 महिन्यानंतर काँग्रेसची पहिली ऑफलाईन बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकांसह विद्यमान राजकीय घडामोडींवरही चर्चा होणरा आहे. या बैठकीत उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसेवरही चर्चा होणार आहे. लखीमपूर हिंसेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला होता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून दोन्ही सरकारांना घेरलं होतं. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या घटनेची निपक्ष चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

राहुल गांधी अध्यक्ष होणार?

आजच्या बैठकीत पक्षाध्यक्ष निवडीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या जी-23 गटाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी केली होती. तसेच पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्याची मागणीही केली होती. निवडणुकीनंतरच अध्यक्ष निवडण्याची मागणीही यावेळी केली जात आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून नव्या अध्यक्षपदावर निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही नेत्यांनी तर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!