राज्यातही पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपया 44 पैशांनी स्वस्त

0 53

केंद्र सरकारने काल पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सकारात्मक पाऊल उचललं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील करकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपये ४४ पैसे स्वस्त होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. लागोपाठ २ दिवस पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्याने महागाईत होरपळणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

केंद्राकडून कर कमी झाल्यानंतर राज्य सरकारने देखील यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली होती. लोकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाकरे सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल २ रुपये ८ पैशांनी स्वस्त झालं आहे तर डिझेल १ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याने कमी केलेल्या करामुळे दोनच दिवसांत पेट्रोल आता ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर डिझेल ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोल-डिझेलचे हे नवे दर कधी लागू होतील याबाबत सध्या अधिकृत माहिती नाही. पण, लवकरच हे दर लागू होण्याची शक्यता आहे.

केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा मोठा निर्णय काल जाहीर केला. पेट्रोलचा दर ९.५० पैसे आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे.

राजा उदार झाला, हाती भोपळा दिला, राज्य शासनाच्या निर्णयानंतर दरेकरांची प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या निर्णयानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काही अंशी का होईना राज्य सरकारने कर कमी करण्याचा प्रयत्न केला. ते स्वागतार्ह आहे. परंतु राजा उदार झाला, हाती भोपळा दिला… अशा प्रकारे अत्यल्प पैसे कमी करून फार परिणाम होणार नाहीत. ३-४ रुपये जर कमी झाले तर फार मोठा दिलासा ग्राहकांना मिळाला असता. थोडा का होईना प्रयत्न केला, पण यातून फार मोठा दिलासा मिळेल असं मला वाटत नाही”, असं दरेकर म्हणाले.

error: Content is protected !!