
श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळेचे उदघाटन
परभणी, दि.06
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात दि.6,गुरुवार रोजी प्राचार्य डॉ. आनंद पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामार्फत ‘अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व आणि व्यावसायिकता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्या तथा मानव विकास तज्ञ डॉ.विशाला पटनम् यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यशाळेत त्यांनी आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आवडी-निवडी बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच ते एक उत्कृष्ट शेतकरी ,शिक्षक आणि सोल्जर होते असे सांगितले. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत करण्यासाठी आणि अभियंत्याचे ज्ञान आणि कौशल्य चांगले विकसित करून घेऊन चांगले स्टार्ट अप व चांगली नोकरी मिळवण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत त्यांनी मांडले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची, कुटुंबाची, महाविद्यालयाची आणि देशाची प्रतिष्ठा कमावण्यासाठी अथक प्रयत्न करावे असे आवाहन केले.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी विभाग प्रमुख प्रा.विनोद पवार, प्रा.अनुराधा निकम, प्रा.निशिगंधा वरवंटे, प्रा.राजेश देवकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी क्किज कॉम्पिटिशन मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्डन स्टार प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी यादव यांनी केले तर कु.तनया लोकरे यांनी आभार मानले. तसेच यावेळी कार्यक्रमास विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.