कोरोनाने आई वडिलांचे छत्र हिरावून घेतलेल्या बालकांना ‘जगदीशब्द फाउंडेशन’चा आधार

0 12

 

करमाळा,दि 27 ((प्रतिनिधी)ः
कोरोनामध्ये वडील गमावलेल्या शेटफळ (ता.करमाळा) येथील सोमनाथ माने यांच्या मुलांना ‘जगदिशब्द’ फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली.

गेल्या वर्षी मे महिन्यात शेटफळ येथील खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे सोमनाथ माने या अठ्ठावीस वर्षीय तरूणाचे दु:खद निधन झाले होते, त्याला तीन लहान मुले आहेत ही बातमी ‘जगदिशब्द’ फाऊंडेशनचे अध्यक्ष मुळ करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक कार्यकर्ते जगदिश ओहोळ यांना पुणे येथे कळल्यानंतर त्यानी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला व त्यांच्या तीन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले गेल्या वर्षी त्यांनी सर्व शालेय साहित्याची मदत केली होती.

यावर्षीही माने कुटुंबियांना भेट देऊन मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे. आशा प्रकारची मदत सोगावं येथील कोरोना काळात आई वडील गमावलेल्या बालकांनाही केली असून या मुलांचे शिक्षण थांबू नये, ती बालके शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत या हेतूने जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. शेटफळ व सोगावं येथे साहित्य वितरित करताना सरपंच स्वप्निल गोडगे, या फाऊंडेशनचे निलेश पाखरे, साहित्यिक गंगासेन वाघमारे ग्रामपंचायत सदस्य बापू सलपुरे, विलास सव्वालाख, दया सरडे, दत्ता सावंत, दादा गोडगे, राजेंद्र नगरे, दादा सरडे व नागरिक उपस्थित होते. तर शेटफळ येथे सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे व नागनाथ माने उपस्थित होते.

कोरोनामुळे आई-वडील गमावलेली छोटी बालके घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाचा मुळ प्रवाहापासून दूर जाऊ नयेत व या कुटुंबाच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असुन यामधुन आम्हाला मानसिक समाधानाचा अनुभव मिळतो.
जगदिश ओहोळ, जगदिशब्द फाउंडेशन

जगदिश भाऊ आमच्या लेकरांसाठी शाळेचं साहित्य घेऊन आठवणीने आले, आमच्या मुलाबाळांच्या एल शिक्षणावर त्यांचं लक्ष आहे, यागोष्टीचा आधार वाटतो.
– रूक्मिणी माने, सोमनाथ माने यांची आई

error: Content is protected !!