कार्तिकी एकादशी

0 66

जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा ।
तुज वांचूनि केशवा अनु नावडे ॥
जीवें अनुसरलिये अझून का नये ।
वेगी आणा तो सये प्राण माझा ॥
सौभाग्यसुंदरु लावण्यसागरु ।
बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठलु ॥
संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग

 

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते.
कार्तिकी एकादशी ही हिंदू धर्मातील एक व्रत म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते व आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागे होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो.

dr. kendrekar

 

आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात.
संपूर्ण वर्षांमध्ये एकूण 24 एकादशी असतात. प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात एक व अधिक मास असल्यास त्या दोन एकादश्या जास्त येतात. कार्तिकी एकादशी आषाढी एकादशीमध्ये एकादशीला जास्त महत्त्व आहे.

 

विष्णुप्रबोधोत्सव-
दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस ‘देवशयनी एकादशी’ म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात, अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी’ असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.

 

या दिवशी वारकरी संप्रदायातील  तसेच  वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. विठ्ठल भजन-कीर्तनात दिवस घालवितात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.

 

कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते. वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी आणि कार्तिकी एकादशांना उपवास करतात. ही एकादशी लहान-मोठे म्हातारे सर्वच व्यक्ती साजरी करत असतात किंवा या दिवशी उपवास धरत असतात.

तुलसी विवाह-
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात.

 

तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात.

 

आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते.

 

आवळी भोजन-
आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.

कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं येत असतात.

 

ही एकादशी निर्जला एकादशी सारखीच अतिमहत्त्वाची मानली जाते. म्हणजे ही एकादशी केली तर इतर सर्व एकादश्या केल्याचे पुण्य लाभते अशी लोक श्रध्दा आहे. पुराणात कार्तिकी एकादशीला पूजा आणि नामस्मरण करणाऱ्या भक्तांची पातके नष्ट होतात असे सांगण्यात आलेले आहेत. म्हणूनच कार्तिकी एकादशी मनोभावे साजरी करण्याची पद्धत आहे. पुण्याईची प्राप्ती करून देणारी अशी ही कार्तिकी एकादशी…!

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली
तुझे रूप ओठी, तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तु आम्हा
लेकरांची विठुमाऊली….
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

ज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका

error: Content is protected !!