खानगाव- खडक माळेगांव मिरची मार्केटला ३४ कोटी ७५ लाखांच्यावर आर्थिक उलाढाल

0 37

रामभाऊ आवारे
निफाड,दि 21 ः
शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला जवळची बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांना शेतीत हाडाची काडे करुन गाळलेल्या घामाचे हक्काचे चार पैसे हातात मिळावे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत खानगाव- खडक माळेगांव येथे प्रायोगिक तत्वावर मिरची, भाजीपाला मार्केट सुरू असून खडक माळेगाव-वनसगाव सह परीसरातील गावातील शेतकऱ्यांबरोबरच इतर तालुक्यातूनही मुबलक प्रमाणात मिरची, व इतर भाजीपाला विक्रीस येत आहे अल्पावधीतच या मिरची मार्केटमध्ये १ सप्टेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ अखेर १,९८,३१६ भाजीपाला व मिरची आवक आली असून ३४ कोटी ७५ लाख ५४ हजार २६० रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.यातुन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ला बाजार फी म्हणून ३४ लाख ७५ हजार ५४२ रुपये मिळाली आहे अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णाताई जगताप यांनी दिली आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या लासलगाव- पिंपळगाव रस्त्यावरील खानगाव नजीक/खडक माळेगाव उपबाजारात भाजीपाला व मिरची मार्केट सुरु करावे अशी मागणी ४/५ वर्षांपासून खडक माळेगाव,खानगाव,वनसगाव ,सारोळे खुर्द, ब्राह्मणगाव (वनस), कोटमगाव, हिंगलाजनगर ,थेटाळे, शिवडी, कोळवाडी, सोनेवाडी, रानवड, सावरगाव, नांदुर्डी,टाकळी (विंचूर), दरसवाडी या गावातील असंख्य शेतकऱ्यांनी खानगाव उपबाजारात भाजीपाला विक्री व्यवस्था सुरू करावी अशी मागणी केली होती.
अखेरीस १ सप्टेंबर २०२० रोजी प्रायोगिक तत्त्वावर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप ,सचिव नरेंद्र वाढवणे, प्रभारी वैभव वाकचौरे तसेच निवडक शेतकरी व व्यापारी यांच्या उपस्थितीत मिरची मार्केट सुरू करण्यात आले .मिरची मार्केटला शेतकरी, व्यापारी ,अडते, मजूर वर्ग व संबंधित घटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खानगाव -खडकमाळेगाव उपबाजारात मिरची व भाजीपाला मार्केट सुरू केल्याने परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करून आपल्या उत्पन्नात वाढ केल्याने या मार्केट मुळे शेतकरी समाधानी आहे.एकंदरीत या ठिकाणी नांदगाव, येवला, कोपरगाव, सिन्नर ,निफाड,दिंडोरी,चांदवड, देवळा,कळवण,अभोणा,लोहणेर आदी तालुक्यातून मिरची, टोमॅटो ,कोबी ,फ्लाॅवर, भेंडी ,कारले,वांगे,मेथी, व भाजीपाला लिलावासाठी येत असल्याने लवकरच नाशिक जिल्ह्यातील खानगाव मिरची मार्केट हे मिरची हब म्हणून ओळखले जाईल.

स्थानिक शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेल्या खानगाव- खडकमाळेगाव मिरची मार्केट ला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांची खूप दिवसांची मागणीची पूर्तता झाली असली तरी या उपबाजारातील आवक लक्षात घेऊन सद्य स्थितीत सुरू असलेले तात्पुरते मार्केटला कायमस्वरूपी दर्जा मिळावा.
बाबुराव पाटील सानप
वंजारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोनेवाडी.

द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष पिकाला खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळला असून खानगाव- खडक माळेगाव येथे सुरू झालेल्या मिरची मार्केट मुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपला वेळ व वाहतूक खर्चात बचत झाल्याने परिसरातील शेतकरी समाधानी आहे.
विकास विनायक रायते
तालुका संघटक शिवसेना निफाड (खडक माळेगांव).

error: Content is protected !!