लालपरी थांबली,राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु,बुधवारी मुख्यमंत्र्यासोबत बैठक

0 91

परभणी,दि 03 ः
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना महाराष्ट्रात एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आजपासून (३ सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले असल्याने ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारांपैकी ३५ आगार पूर्णतः बंद आहेत. इतर आगारांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः काम सुरू आहे. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही. परंतु, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही. परंतु, मराठवाड्यातील,परभणी, लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.

एसटी कामगारांच्या मागण्या काय?

एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली. या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.

वेतनवाढ न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी संप पुकारण्यात आला होता. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवार ४ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीची बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देखील केले आहे.

error: Content is protected !!