लासलगाव बाजार समितीत जिल्ह्यात सर्वाधिक कांदा आवक

जानेवारी२०२२ च्या सुरुवातीला १२ दिवसात २३२१६६ क्विंटल कांदा विक्री

0 118

रामभाऊ आवारे
निफाड,दि 14 ः
आशिया खंडातील नावाजलेली कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अमावस्या, शनिवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बंद असलेले कांदा लिलाव सुरू केल्याने येथील बाजार आवारावर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढू लागली आहे. दररोज ५० ते ५५ हजार क्विंटल कांद्याची आवक एकट्या लासलगाव बाजार समिती होत आहे. त्यामुळे दररोज होणारी उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३ लाख क्विंटल पेक्षा जास्त आवक चालू वर्षी झाली असल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांपेक्षा लासलगाव मध्ये कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा अधिकचा कल असल्याचे दिसून येत आहे अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णाताई जगताप यांनी दिली आहे.
लाल भडक कांदा म्हटलं की डोळ्यासमोर नाव येतं ते लासलगावचंच, सर्वाधिक कांदा आवक व सरासरी भाव देखील चांगला असल्याने लासलगाव बाजार समिती मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कांद्याची उलाढाल होत असते. लासलगाव बाजार समितीत यापूर्वी अमावस्येला तसेच शनिवारी व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी पूर्णपणे कांदा लिलाव बंद असायचे. मात्र जुन्या पद्धती कुठेतरी काळानुरूप बदलल्या पाहिजे या हेतूने व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिल्यामुळे या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याने चालू वर्षात सुमारे ८० ते ९० दिवसाचे जास्त दिवस मिळाल्याने त्याचा थेट परिणाम कांदा आवक वाढीवर झाला आहे. सन २०२० डिसेंबर मध्ये लाल कांद्याची सुमारे २ लाख ३० हजार क्विंटलची आवक येथे झाली होती. बाजार समितीतील सुट्ट्या कमी केल्याचा परिणाम म्हणून यंदा कांदा अवके वर लक्ष वेधले असता गेल्या महिन्यात डिसेंबर महिन्यात लाल कांद्याची आवक सुमारे ५ लाख ७० हजार क्विंटलची झाली होती. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन लाख 50 हजार क्विंटल ने मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याचे लक्षात येत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या बारा दिवसात लाल कांद्याची सुमारे ४ लाख ४० हजार क्विंटल ची प्रचंड आवक झाली आहे. लासलगाव बाजार समितीत दररोज १५०० ते २००० वाहनातून कांदा विक्रीसाठी येत असतो. दोन सत्रा मध्ये कांद्याची लिलाव प्रक्रिया पार पडते. यापूर्वी आवकेमुळे पहिल्या सत्रातील अनेक वाहनांचा लिलाव दुसऱ्या सत्रात केला जात होता. व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिल्या मुळे सध्या स्थितीत पहिल्या सत्रात एकही वाहन लिलावा विना शिल्लक राहात नसल्याने शेतकरी देखील समाधानी आहे.दररोज लासलगाव बाजार समितीत ५० ते ५५ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे. सध्या कांदा किमान भाव ७०० रुपये, जास्तीत जास्त भाव २५८५ रुपये व सरासरी भाव २००० रुपये दराने विक्री होत आहे. सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी बाजार भावाची पातळी समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. इतर राज्यातील कांदा लेट परीणामी नाशकातील कांद्याचे भाव टिकले असुन सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर हे टिकून आहेत त्याचे मुख्यता कारण म्हणजे गुजरात राज्यातील कांदा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उशिराने बाजारपेठेत दाखल होणार आहे तसेच मध्यप्रदेशमध्ये मध्यंतरी पावसामुळे लागवड झालेला कांदा नुकसानग्रस्त झाल्याने तेथेही अजून पाहिजे त्या प्रमाणात कांदा बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकला नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चांगल्या प्रमाणात मागणी असल्याने बाजारभाव टिकून असल्याची माहिती सभापती सौ सुवर्णाताई जगताप यांनी दिली आहे.

सुट्ट्या बंद केल्याने बाजार समितीच्या कामकाजात वाढ
बाजार समितीच्या स्थापनेपासून दर शनिवार ,अमावस्या व सार्वजनिक सुट्ट्यांना बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद राहायचे मात्र व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे या सर्व सुट्ट्या बंद केल्या आहेत परिणामी कामाचे सुमारे ८० ते ९० दिवस वाढल्याने त्याचा परिणाम देखील कांदा आवकेवर दिसून आला असून स्पर्धात्मक युगात जो चांगले काम करेल त्याला फायदा होत असतो. तसाच फायदा लासलगाव बाजार समितीला होताना दिसत आहे.
नरेंद्र वाढवणे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव

 सुट्ट्या बंद केल्यामुळे असे वाढले कामाचे दिवस..
अमावस्या – १२, शनिवार- ४८, सार्वजनिक सुट्ट्या – २०
गेल्या काही दिवसांची लासलगाव बाजार समितीत झालेली कांद्याची आवक….

दिनांक आवक क्विंटल मध्ये
०१|१२|२०२२ २५०८१
०३|०१|२०२२ ४२६३३
०४|०१|२०२२ ४४२१२
०५|०१|२०२२ ५०६४२
०६|०१|२०२२ ४८६७६
०७|०१|२०२२ ५३३२९
०८|०१|२०२२ २६००८
१०|०१|२०२२ ५४४५३
११|०१|२०२२ ५६८१४
१२|०१|२०२२ २९६२०
१३!०१!२०२२. २५३०४

१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० कांदा आवक क्विंटल मध्ये
लासलगाव :- २६३०००
विंचूर :- १७१०००
निफाड :- ३६०००
१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ कांदा आवक क्विंटल मध्ये
लासलगाव :- ३६४०००
विंचूर :- २६८६०५
निफाड :- २३६००
१ जानेवारी ते १२ जानेवारी २०२२ कांदा आवक क्विंटल मध्ये
लासलगाव :- २३२१६६
विंचूर :- २०८५१२
निफाड :- २३९३०

error: Content is protected !!