महाराष्ट्राच्या लेकींचा…राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार देऊन गौरव

शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या या संकल्पनेतून प्रथमच खेळाडूंच्या मातांचा गौरव

0 20

निफाड,दि 14 (प्रतिनिधी)ः
जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशन च्या वतीने राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. निफाड शहरातील सरस्वती विद्यालयातील सभागृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला.
यावेळी सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. ज्योती भागवत व सौ.अंजली गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी श्रीम. ज्योती भागवत तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अंजली गायकवाड , शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. विलास गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते. “जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय शंभूछावा.. जिजाऊ तुम्ही नसता तर मिळाला स्वराज्याचा ठेवा..जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे..” या युक्तीप्रमाणे आपणही आपल्या पाल्यास जिजाऊ मातेच्या प्रेरणेतून सुसंस्कार देऊन भारताचा एक चांगला नागरिक व खेळाडू बनवण्याची प्रेरणा दिली हे कार्य न विसरण्यासारखे आहे असा उल्लेख शिव आविष्कार स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड यांनी आपल्या भाषणातून केले.
या शुभ प्रसंगी राष्ट्रीय व राज्य खेळाडूंच्या आई सौ.रेखा कोटकर, सौ.सुरेखा कोंढरे,सौ.लंका कोटकर,सौ.सुनंदा राजोळे, सौ.मनिषा घोटेकर,सौ. शोभा बोरगुडे,सौ.शिवानी पडोळ,सौ.वंदना गिते,सौ.अनिता बाजरे यांचा फेटे बांधून मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शाळा, तालुका, जिल्हा,विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवणाऱ्या तसेच सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा गौरव नेहमीच केला जातो. शिवाय या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचाही सन्मान केला जातो मात्र शिव आविष्कार स्पोर्ट्स फाउंडेशनने पुढाकार घेऊन प्रथमच खेळाडूंच्या मातांचा जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव केला. याक्षणी पुरस्कार स्वीकारतांना आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतांना दिसले. या कार्यक्रमप्रसंगी श्रीम.निलम बेंडकुळे यांनी सूत्रसंचालन केले व श्री. विलास गायकवाड यांनी आभार मानले.

error: Content is protected !!