महाराष्ट्राची ‘शिवज्योत’ मालवली

0 93

 

 

वृत्तसेवा – गजानन जोशी – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बळवंत मोरेश्वर पुरंदरे (जन्म २९ जुलै १९२२) हे बाबासाहेब पुरंदरे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. भारतातील एक चांगले लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. २५ जानेवारी २०१९ रोजी त्यांना पद्मविभूषण,भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता…

त्यांचं बहुतांशी लेखक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित घटनांवर आधारित आहे. त्यांना शिवशाहीर म्हणून संबोधले जात होते. त्यांना मुख्यतः जाणता राजा या लोकप्रिय नाटकासाठी ओळखले जाते. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश आणि गोव्यातही लोकप्रिय होते. पुरंदरे यांनी पुण्याच्या पेशव्यांच्या इतिहासाचाही अभ्यास केला आहे. माधव देशपांडे आणि माधव मेहेरे यांच्यासह १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण योगदानासाठीही त्यांना ओळखले जाते. २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांना न्यूमोनिया झाला असल्याने साधारण ३,४ दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. अचानकपणे रविवारी,रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र,रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते १९४१ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६४ ‘ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सरकारने त्यांना सन २०१५ मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत…

“बाबासाहेबांनी जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले”
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडकेंबरोबर हिरिरीने सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर साहित्य प्रकाशित झालेय…

“महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान”
शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्यात. या पुस्तकाची १७ वी आवृत्ती ३१ मार्च २०१४ ला प्रसिद्ध झाली. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने २०१५ साली महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कारही दिलाय, तर २०१९ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले. डी. वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले हा बाबासाहेबांच्या अभ्यासाचा विषय होता. बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं. पण अनेक प्रसंगी त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही झाली. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना “शिवशाहीर” म्हणतात,पण त्यापुढे जाऊन ते म्हणायचे की “मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा.”बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत: ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन,ललिक कादंबरी लेखन,नाट्य लेखन केलं. ‘राजा शिवछत्रपती’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती मानली जाते. तसंच जाणता राजा हे नाटकही लोकप्रिय आहे.

बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या नाटकाचे १२०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक ५ भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. व दीडशे कलावंत,असंख्य प्राणी आणि भव्य रंगमंच हे या नाटकाचं वैशिष्ट्य होत.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद
२०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती.

बाबासाहेब पुरंदरे
‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला’ हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. “बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत,अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही,” असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात.

त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते,राष्ट्रवादीचे काही आमदार यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या १० लाख रकमेपैकी फक्त १० पैसे स्वतःकडे ठेऊन,त्यात १५ लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती.

~ Twitt ~
“इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत.”
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
राज्यसभा सदस्य,भारत सरकार

 

“बाबासाहेब पुरंदरे यांनी खऱ्या अर्थानं शिवचरित्र त्यावेळच्या मुलांना समजून सांगितलं, त्यातून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली.”
श्रीमान नितीन गडकरी
मंत्री – सडक परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय,भारत सरकार

 

 

प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा!

बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख,प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता.

ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही.
एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले.
– श्रीमान देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्ष नेता,विधानसभा महाराष्ट्र

 

 

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे. शिवशाहीर पद्मविभूषण,महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे निधनाने इतिहास पोरका झाला.
श्रीमान उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य

 

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला.
– श्रीमान शरद पवार
राष्ट्रीय अध्यक्ष,रा.काँ.पार्टी

 

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्या रसाळ,लालित्यपूर्ण वाणी – लेखणीने महाराष्ट्रातील घराघरांत नेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्यातून निघून गेले.
शिवशक्तीला “मनसे” ओम् शांति
राज ठाकरे
अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

 

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगात पोहोचविला. घराघरात शिवभक्त निर्माण व्हावेत हा त्यांच्या आयुष्याचा ध्यास होता. बाबासाहेबांनी हे व्रत आयुष्यभर निष्ठेने जोपासले…
– श्रीमान परिणय फुके
विधान परिषद सदस्य,भंडारा – गोंदिया

 

अखंड आयुष्य शिवचिंतनात घालवणारे शिवशाहीर कार्तिकी एकदाशीला भागवतमय होत, अनंतात विलीन झाले. गत १०० वर्षांचा हा प्रचंड प्रवास एकादशीच्या दिवशीच संपावा हा योगायोग कसा म्हणावा. बाबासाहेबांच्या ८० व्या वाढदिवशी सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते की मी १०० वर्षे जगणार आणि अक्षरशः इच्छा मरणाचं वरदान प्राप्त झाल्यागत ते खरं ठरलं,बाबासाहेब गेले ते शंभरीतच. अश्या तत्वत्वेषी व्यक्तीत्वास आदरांजली…
– 
शैलेश गोजमगुंडे
प्रदेश संयोजक-सांस्कृतिक प्रकोष्ठ,भाजपा
तथा गटनेता-मनपा लातूर.

महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे एकमेव व्यक्तिमत्व शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे.

■ (दि.१५ नोव्हें) पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी प्राणज्योत मालवली.
■ सकाळी ८:३० वाजता पर्वती पायथा निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी होते.
■ सकाळी १०:३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 मुरलीधर मोहोळ
महापौर,पुणे महानगरपालिका

error: Content is protected !!