८ मार्च जागतिक महिला दिनाचा उत्साह

0 289
दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन 1911 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
 महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचा स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री असा  सर्वसाधारणपणे समज रूढ होता आणि आजही आहे. आजही स्त्रीकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदललेली नाही तिच्या वागण्याला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेली आहे हे माळभ हटविण्यासाठी  तिचा निकराचा लढा सुरूच आहे जन्म घेण्याआधीच जगातल्या सर्व सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळ्याला नख लावण्याचे दुष्कर्म केले जाते सासरी तिचा मानसिक शारीरिक छळ केला जातो तरीही ती सारे सहन करते पण आता हे चित्र बदलले आहे स्त्रीला आपल्या हक्काची कर्तव्याची स्वत्वाची जाणीव झाली आहे आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना दोन पावले पुढेच आहे हा स्त्रीशक्तीचा अभिमान आहे. वर्षानुवर्षे तिला  बंद केलेल्या वाटा तिने स्वकर्तृत्वाने मोकळ्या केल्या आहेत. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आपण कर्तबगारी गाजवू शकतो हे तिने सिद्ध करून  दाखविले आहे. आपण वृत्तपत्र टीव्हीवर अनेकदा बातम्यांमधून स्त्रियांवर होणारे अन्याय,अत्याचार पाहतो. एकतर्फी प्रेमातून कितीतरी जणींचा काही गुन्हा नसताना बळी जातो गुन्हा करणारे मात्र मोकाट फिरतात. याला जबाबदार कोण समाजातील दुष्ट प्रवृत्तींना रिचवत पचवत ती तिची लढाई लढत आहे ती समाजाच्या नीतिमत्तेचा कणा आहे. हे सारे नीतिमत्ता हरवलेल्या समाजाला कधी कळणार हा ही प्रश्नच आहे निसर्गाने तिला प्रेम, मातृत्व,ममता या विलक्षण देणग्या दिल्या आहेत ते तिचे शस्त्र आहे.त्या शस्त्राने ती अनेक अवघड शल्यकर्मे सहजरित्या पार पाडते तिच्या शब्दात मंत्रांचे सामर्थ्य आहे. या मंत्राने ती अग्नी फुलवू  तसेच विझवु शकते. तिच्या डोळ्यातल्या अंगाराला कायद्याचे कवच लाभले तर दुष्कर्म करणारे क्रूरकर्मा निश्चितच पुढे येण्यास कचरतील.ज्ञानदेव म्हणतात की स्त्री-पुरुषन्नाम भेदे l शीवपण ऐकले नांदे l म्हणजे शिवशक्तीचे स्वरूप वरून जरी दोन दिसत असले तरी त्यांचे तत्व एकच आहे स्त्री पुरुष समानता याच्यापेक्षा  सोप्या शब्दात सांगता येणार नाही.
 आजची स्त्री स्वेच्छेने किंवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडून अर्थार्जन करू लागली. घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या  व्यवसायाच्या किंवा कार्यालयाच्या कामात सतर्क राहू लागली तरी तिला दुय्यम दर्जाची वागणूक अनुभवावी लागते. स्त्री शिक्षित झाली म्हणून आज तिला स्वतंत्र विचार करण्याची व ते अमलात आणण्याची संधी मिळू शकली. तिची ज्ञानाची कवाडे मोकळी झाल्यामुळे ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली.स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव ज्योतिबा फुले आगरकर महर्षी कर्वे अशा महात्म्याना फार वर्षांपूर्वी झाली होती. बंधनात अडकलेल्या स्त्रियांना मुक्त करण्यासाठी त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले म्हणूनच स्त्री आजची स्थिती सुधारली आहे.
 महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवलेली त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान खूप मोठे आहे समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या पती-पत्नीने स्त्रीशिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला 1902 मध्ये रमाबाई रानडे यांनी ” हिंदू लेडीज स्पेशल अँड लिटरली क्लब ” ची स्थापना केली तर 1904 मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना झाली.त्या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागली त्यातून प्रथम संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मग स्त्रियांना मतदाना बरोबरच निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा सन 1935 पर्यंत होत गेल्या भारतात 1943 साली पहिला महिला दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्यानंतर 1950 सालापासून भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे. संयुक्त राष्ट्राने सन 1975 हे जागतिक महिला दिन म्हणून घोषित केले हे भारतातही साजरे झाले महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी  दिलेल्या लढाईच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा होतो.स्त्रीच्या “अर्ध्या आभाळा”तला श्रद्धेचा, विश्वासाचा सूर्य कधीच न मावळो हीच जागतिक महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा….
madhavi vaidya
माधवी वैद्य ( डोंबिवली )
मोबाईल – ९९३०५११९३७
error: Content is protected !!