मुंबै बँक निवडणुकीचे निकाल जाहीर; अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले

0 111

 

 

 

 

मुंबई, गुरुदत्त वाकदेकर – मुंबै बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी विकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध करत भाजपचा पराभव केला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अध्यक्षपद शिवसेनेच्या उमेदवाराला दिले जाणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपचे प्रसाद लाड यांचा ११ विरुद्ध ९ मतांनी पराभव केला.

 

उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले
अध्यक्षपदावर महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी उपाध्यक्षपद भाजपच्या गळ्यात पडलं आहे. उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे युवा संचालक अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपद निवडण्याचं ठरलं. यामध्ये भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी बाजी मारली. 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई बँकेतील प्रतिनिधीची एकत्र बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि सुरज चव्हाण ही उपस्थित होते. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली आणि सर्वानुमते अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांचे नाव जाहीर करण्यात आले मुंबै बँक संचालक पदाच्या २१ पैकी १७ जागांवर बिनविरोध उमेदवार विजयी झाले होते.

 

आज उर्वरीत चार जागांच्या मतमोजणीत दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना १८ मतं तर सुखदेव चौगुले यांना १६ मतं मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना १३१ मतं तर कमलाकर नाईक यांना ५९ मतं मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना ३३२ मतं तर, शालिनी गायकवाड यांना १८८ मतं मिळाली. भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांनी तब्बल चार हजार मतं मिळवली तर, यलाप्पा कुशाळकर यांना अवघी ३५० मतं मिळाली.

 

दरम्यान मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी माघार घेत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. महाविकास आघाडीच्या विजयात शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, आमदार सुनील राऊत व संदीप घनदाट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

विद्यमान संचालक मंडळावर राष्ट्रवादी व कॅाग्रेस ८, भाजपचे ९ तर शिवसेनेचे ३ उमेदवार विराजमान आहेत. त्यामुळे आजच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांच्या निवडणूकीत कमालीची चुरस होणार हे स्पष्ट झाले होते. अध्यक्षपदासाठी भाजप-राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा सुरू झाली असतानाच शिवसेनेची तीन मतं निर्णायक ठरली होती.  अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी किमान ११ मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप तसेच राष्ट्रवादीला किमान दोन मतांची गरज होती.

 

बिनविरोध निवड झालेल्या १७ उमेदवारांची नावे:-

नागरी सहकारी बँक

संदीप सीताराम घनदाट

आ. प्रविण यशवंत दरेकर

 

पगारदार सहकारी संस्था

आ. प्रसाद मिनेश लाड

 

नागरी सहकारी पतसंस्था

शिवाजीराव विष्णू नलावडे

 

गृहनिर्माण संस्था

आ. सुनील राजाराम राऊत

अभिषेक विनोद घोसाळकर

 

मजुर सहकारी संस्था

आ. प्रविण यशवंत दरेकर

आनंदराव बाळकृष्ण गोळे

 

औद्योगिक सहकारी संस्था

सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे

विष्णू गजाभाऊ घुमरे

 

इतर सहकारी संस्था

नंदकुमार मानसिंग काटकर

जिजाबा सीताराम पवार

 

व्यक्तिगत (वैयक्तिक)

सोनदेव बाळाजी पाटील

 

महिला राखीव मतदार संघ

शिल्पा अतुल सरपोतदार

कविता प्रकाश देशमुख

 

अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ

विनोद दामू बोरसे

 

इतर मागासवर्गीय मतदार संघ

नितीन धोंडीराम बनकर

 

या निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, “भाजपकडे १० मतं होती, विष्णू घुमरे हे फुटले, त्यामुळे महाविकास आघाडीला ११ मतं मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याने मोठा दबाव निर्माण केला. सत्तेचा दुरुपयोग करुन ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली.”

error: Content is protected !!