श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

0 62

परभणी,दि 24 (प्रतिनिधी)ः
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शनिवारी (दि.२४) रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बापूराव आंधळे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, कार्यक्रमाधिकारी डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ.दिगंबर रोडे, प्रा.राजेसाहेब रेंगे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.बापूराव आंधळे म्हणाले, महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी रासेयोची स्थापना करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक भान, कर्तव्य, जबाबदारी आदी संस्कार पेरण्याचे कार्य होत आहे. ‘मी नाही तर तुम्ही’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना समाजसेवेचे धडे शिकवले जातात. रासेयो केवळ योजना नाही तर समाज बदलाची एक चळवळ आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठीची भावना समाजात वृद्धिंगत करण्यासाठी रासेयो प्रयत्न करत आहे. श्रम प्रतिष्ठा, सामाजिक समस्या सोडवणे आदी सामाजिक ऋण फेडण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात डॉ.श्रीनिवास केशट्टी म्हणाले, रासेयो ही एक सामाजिक बदलाची चळवळ आहे. गांधींच्या विचारावर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारी ही योजना विद्यार्थ्यांचे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास करते. विद्यार्थ्यांनी या योजनेच्या माध्यमातून आपला चौफेर विकास करून घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी प्रसिद्धी प्रमुख डॉ.जयंत बोबडे, प्रा.विलास कुराडकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत खंदारे, प्रास्ताविक डॉ.तुकाराम फिसफिसे तर आभार प्रदर्शन विजय गरुड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पेदापल्ली, साहेब येलेवाड, ओंकार बोकरे, संदीप कावळे, राणी भागवत, कावेरी कानोडे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी बहुसंख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.

error: Content is protected !!