नवाब मलिक अधिवेशनाला उपस्थित पण राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाकडून?
Maharashtra Winter Session 2023 : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट दुसऱ्यांदा समोरासमोर येणार आहे. मात्र अद्यापही अजित पवार गटात इनकमिंग सुरुच आहे. मनी लॉड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात जाऊन आलेले नवाब मलिक (Nawab Malik) नेमके कोणत्या गटात जाणार अशी चर्चा सुरु असताना मोठी घडामोड समोर आली आहे.
गेल्या काही काळापासून तुरूंगाची हवा खात असलेले नवाब मलिक जामिनावर तुरूंगाबाहेर असून, आज त्यांनी अधिवेशनासाठी सभागृहात हजेरी लावली. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत बसले. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि नवाब मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. पण आता यावर अजितदादांच्या गटाकडून उत्तर देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटातील नेत्या रूपाली चाकणकर यांनी नुकतीच यावर भूमिका स्पष्ट केली. “राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीला असेच वाटत असतं की आपल्या भागाचा विकास व्हायला हवा. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येकालादेखील ही भावना वाटते. राज्याचा विकास अजित पवार करू शकतील असा सर्वांना विश्वास आहे. म्हणून सर्व लोकप्रतिनिधी हे अजित दादांबरोबर आहेत. सगळ्या आमदार खासदारांनी लोकप्रतिनिधींनी विकासासाठी अजितदादांना समर्थन दिले आहे. त्यामुळेच पक्षातला आमदार खासदार आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी हा अजित दादांबरोबर असल्याचे पाहायला मिळतेय,” अशा शब्दांत अजित दादांच्या गटाकडून रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
अंबादास म्हणाले, “खालच्या सभागृहात एक सदस्य बसले आहेत, ज्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने अशी भूमिका घेत होते की आम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. त्यांच्याविरोधात काय गुन्हे होते, हे माहित आहे.” अंबादास दानवेंनी हा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात गोंधळ सुरू झाला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही हा प्रश्न उद्या उपस्थित करण्याची विनंती केली. परंतु, अंबादास दानवे आपल्या प्रश्नावर ठाम राहिले. यावर अंबादास दानवे म्हणाले, “एक सभासद सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आहेत. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलं की एका देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. उघड उघड दाऊद इब्राहिमची वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार जाहीर केले. त्यामुळे याबाबत सरकारची भूमिका काय हे कळलं पाहिजे.”