नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा-चंद्रकांत पाटील यांची मागणी

0 44

कोल्हापूर,दि 11 ः
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करणं. उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणं, नवाब मलिक यांच्यावर एनआयएच्या कारवाईची मागणी आदी मुद्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

नवाब मलिक यांना एनआयनं ताब्यात घ्यावं

चंद्रकात पाटील यांनी नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही, असं म्हटलंय.एनआयएनं नवाब मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे.नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

ठाकरे सरकार पेट्रोल डिझेलवरील कर कधी कमी करणार?

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर महागाई विरोधात काँग्रेस नेत्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यानंतर 11 भाजपशासित राज्यांनीदेखील कर कमी केले आहेत. फक्त भाजपशासित राज्यांनीच नाही तर काँग्रेसशासित राज्यांनी देखील इंधनावरील कर कमी केले आहेत. मात्र, ठाकरे सरकारनं कर कमी करण्याचा निर्णय घेतला नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरेंना सरकारी रुग्णालय का चालत नाही?

उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालय का चालत नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत याचा अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय, असं चंद्रकात पाटील म्हणाले. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कारवाईला घाबरत नाही

नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या कायदेशीर नोटिशीबद्दल विचारले असता आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, असं पाटील म्हणाले.

संजय राऊत यांना बोर्नविटा पिण्याची गरज

दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत.संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच स्पर्धा सुरू झाली आहे… संजय राऊत यांना बोर्नविटा पिण्याची गरज आहे, असा टोला संजय राऊत आणि नवाब मालिक यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

error: Content is protected !!