आता जिल्ह्यात हर घर तिरंगा आणि हर घर वृक्ष लावण्यात येणार

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची संकल्पना

0 44

परभणी, प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी आणि जिल्ह्यात सर्वधर्मसमभावातून हर घर तिरंगा आणि हर घर वृक्ष लागवड मोहिम धर्मगुरूंच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली आहे.

 

शुक्रवार दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पेनेतून आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त जिल्ह्यात एकाचवेळी जातीय सलोख्याचा संदेश पोहोचविण्यासाठी धर्मगुरूंच्या उपस्थितीत हर घर तिरंगा आणि वृक्ष लागवड दिंडी – वृक्ष संवर्धनाच्या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते.

 

यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मौलाना राफयोद्दीन आश्रफी, भन्तेजी एस.संघमित्रा, ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर, डॉ. रामेश्वर नाईक, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदिप घोन्सिकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मुंजाभाऊ गायकवाड, राजेश फड यांच्यासह आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

वृक्ष दिंडी आणि महापुरुषांच्या जयघोषाने परभणीकरांचे लक्ष वेधले
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या नेतृत्वाखाली धर्मगुरूंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हा परिषद इमारती पर्यंत तिरंगा झेंडा घेऊन वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. वृक्ष दिंडी आणि महापुरुषांच्या जयघोषाने परभणीकरांचे चांगलेच लक्ष वेधले. वृक्ष दिंडीच्या समारोपा नंतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात धर्मगुरू आणि डॉ रामेश्वर नाईक यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

 

कार्यक्रमाची रूपरेषा मांडतांना शिवानंद टाकसाळे म्हणाले की, समाजातील धर्मगुरू आपल्या कीर्तनातून, वाणीतून आणि प्रवचनातून नागरिकांना वृक्ष लागवड आणि त्यांच्या संवर्धसाठी संदेश देतील. यामुळे मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार अशा विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीस मदत होईल. मानवीय विचारांची जपवणूक करण्यात भारत देश अग्रेसर आहे. आझादी का अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविधतेतील अखंडता अबाधित राहण्यासाठी वृक्ष लागवड आणि हर घर झेंडा पोहोचविण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले.

आझादी का अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रत्येक घरी तिरंगा फडकावून आणि प्रत्येकाने वृक्ष लागवड करून हिंदुस्थान जिंदाबादचा जयघोष करावा.
मौलाना राफयोद्दीन आश्रफी
मुस्लिम धर्मगुरू



एक घर एक तिरंगा आणि एक व्यक्ती एक झाड लावून प्रत्येकाने माणुसकी जपत आझादी का अमृत महोत्सव साजरा करावा.
भन्तेजी एस. संघमित्रा
बौद्ध धर्मगुरू



शास्त्रज्ञ आणि संत यांचा समन्वय म्हणजे निसर्ग आणि मानवता होय. त्यामुळे या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आपापल्या घरी तिरंगा व वृक्ष लावून देशाभिमान जागवावा
ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर
हिंदू धर्मगुरू



मानवी प्रगतीसाठी अध्यात्माला विज्ञानाची जोड लावणे आवश्यक आहे. त्यामुळे विश्वशांतीसाठी हर घर तिरंगा आणि हर घर वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.
डॉ.रामेश्वर नाईक
सुप्रसिद्ध डॉक्टर

error: Content is protected !!