आता 24 तास मिळणार विठ्ठलाचे दर्शन

0 36

पंढरपूर – पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. दोन वर्षानंतर होणाऱ्या या यात्रेसाठी देशभरातून भाविक येणार आहेत. त्यामुळे यात्रेला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आल्यानंतर आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

 

आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत राज्यभरातून तसेच देशातून लाखो भाविक येत असतात. यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. यासाठी देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. आज सकाळीही 11 वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे आता आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत, अशी प्रथा आहे.

error: Content is protected !!