साच्याच्याबाहेर काम करणारी माणसं वर्तमान घडवतात-सिईओ रश्मी खांडेकर

0 8

परभणी,दि 30 ः
जीवनात साचेबंद जगणारी माणसं हे अनुकरणीय असतात, तर साच्याच्याबाहेर काम करणारी माणसं वर्तमान घडवतात. ओमप्रकाश यादव हे झाडे लावण्याची चळवळ साच्याच्याबाहेर येऊन करत आहेत, असे प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केले.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, आर्वी (ता. परभणी) येथे ता. (३०) मंगळवार रोजी रिसर्च अँड रिसर्च सेंटर, नवी दिल्लीच्या वतीने ओमप्रकाश यादव यांना शिक्षण आणि झाडे लावण्याच्या अद्वितीय कार्याबद्दल”सेवागौरव पुरस्कार-२०२४”खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला; त्यावेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. या पुरस्काराचे स्वरूप शाल-सन्मानपत्र-संविधान आणि सिल्वर मेडल असे आहे.
शिक्षण परिषदेमध्ये आयोजित या उपक्रमामध्ये विचार मंचावर परभणीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष आमले, मा. शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, अरुण चव्हाळ, शिक्षण विस्तार अधिकारी देवानंद वाघमारे, केंद्रप्रमुख महावीर अग्रवाल, मुख्याध्यापिका जे. पी. गुंजेकर आणि आर्वी केंद्रातील विषय तज्ञ आणि सर्व शिक्षक-शिक्षकांची उपस्थिती होती.
शिक्षकांनी वर्तमानाला आपल्या कार्यातून भिडले पाहिजे. शाळेमध्ये सेवा देत असताना जिल्हाभरातील गावखेड्यामध्ये आणि वाडीवस्तीवर तसेच तांड्यावरही खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा नेली पाहिजे. सुरक्षित वातावरणाच्या बाहेर येऊन प्राप्त परिस्थितीला आपल्या कार्याने सिद्ध केले पाहिजे, याकडे त्यांनी उपस्थित शिक्षक आणि शिक्षिकांचे लक्ष वेधले.
शिक्षण परिषद आणि परिषदेतील विषय प्रास्ताविक आणि पुरस्काराच्या संदर्भात अरुण चव्हाळ यांनी मनोगत व्यक्त केले. तर सन्मानपत्राचे वाचन लेखिका गंगा बाकले यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना यादव म्हणाले की,”माझे गाव-माझे तीर्थ आहे. रामपुरी गावामध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन चळवळ सुरू केली. त्या माध्यमातून निसर्गाच्या जवळ गेलो. समाज मला आज”झाडावाले साहेब”म्हणून ओळखत आहे. शिक्षण आणि वृक्ष लागवड चळवळ हे काम सातत्याने करणार आहे. पुरस्काराचे पाठबळ कार्य करण्यास ऊर्जा देते”.
शिक्षण परिषदेमध्ये अध्यापन-अध्ययन पद्धतीचे व्यवस्थापन आणि विश्लेषण, पी जी आय माहिती, शिक्षण सप्ताह आणि आनंददायी शनिवार या अनुषंगाने शिक्षकांनी मार्गदर्शन आणि चर्चा अनुभवी. डायटच्या वतीने गणेश शिंदे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा बाकले यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिंदे यांनी व्यक्त केले.या उपक्रमासाठी गोकर्ण काळे, कल्याण सिराळ, नारायण टेकाळे, प्रकाश पांडे, गजानन शहाणे, गुलाब रेंगे आदींनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!