आळंदी बस स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरावस्था

0 58

दिनेश कुऱ्हाडे
आळंदी,दि 20 ः

पंतप्रधानांनी स्वत:च्या उक्ती व कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला आहे. स्थानिक लोकही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत, तिर्थक्षेत्र आळंदी मध्ये मात्र खुद्द पालिकेचे अधिकारी आणि पालिका प्रशासन याबाबत उदासीन दिसत असून केवळ देखभाल दुरूस्तीअभावी येथील अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी दुरावस्था झाली असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचे महत्व पटवून दिल्याने अनेक ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटले आहे.

परंतु आळंदीमध्ये पालिकेच्या हद्दीत असलेल्या पिएमपील बस स्थानकातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी दुरावस्था झाली आहे.स्वच्छतागृहात झाडे झुडपे वाढून दुरावस्था झाली आहे. याशिवाय शहरातील अनेक स्वच्छतागृहातील दरवाजे – खिडक्‍या अर्धवट अवस्थेत तुटलेल्या आहेत.याबाबत नगरपरिषदेने लवकरात लवकर येथील स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी आळंदी विकास मंचाच्या वतीने करण्यात आली असून आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आळंदी विकास मंचाचे ज्ञानेश्वर कु-हाडे, संदिप नाईकरे, प्रसाद बोराटे यांनी निवेदन दिले आहे.

आळंदी शहरातील अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बाजुलाच कचरा आणि दलदल निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी या सर्वाजनिक स्वच्छतागृहांचा ताबा मोकाट जनावरांनी घेतला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्‍न गंभीर बनला असून गेल्या काही वर्षात पालिकेने आळंदीत विविध ठिकाणी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता गृहे बांधले. त्यावर करोडो रूपये खर्च झाले आहेत.मात्र केवळ नियमित देखभाल आणि दुरूस्तीच्या व स्वच्छतेच्या अभावामुळे आळंदीमध्ये अनेक सार्वजनिक स्वच्छता गृहाचा वापर अद्याप नागरिकांनी केलाच नाही.त्यामुळे स्वच्छतागृह बांधण्यावर झालेला करोडो रूपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याचा आळंदीकरांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

error: Content is protected !!