वनसगावच्या प्रणव सातभाईने विश्वविक्रमाला घातली गवसणी
निफाड,दि 06 (प्रतिनिधी)ः
प्रचंड आत्मविश्वास,जिद्द ,चिकाटी आणि साहस या सर्वांच्या बळावर कोरोना काळात म्हणजेच लॉकडाऊन च्या प्रतिकूल कालखंडात डिजिटल पेटिंग विषयी अधिक माहिती जाणून घेत त्यानंतर सहजगत्या एकाहून एक पोट्रेट साकारणाऱ्या वनसगाव तालुका निफाड येथील प्रणव चंद्रशेखर सातभाई या युवकाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डने त्याची नोंद घेतल्याने अवघ्या एकविसाव्या वर्षी तो विक्रमवीर ठरला असुन वनसगावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवुन आपल्या परिवाराचा नावलौकिक मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. निफाड तालुक्यातून पुढे आलेल्या प्रणव सातभाई याने वनसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण के के वाघ शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात पुर्ण केले.बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मास मीडियाचे देखील शिक्षण घेतले आहे. मात्र,,बारावी नंतरच त्याला छायाचित्रणाची आवड निर्माण झाली. त्यात यश मिळवत असतानाच कोरोनाचे संकटउद्भवले. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाले. महाविद्यालये बंद असल्याने या कालावधीतील सदुपयोग करण्याचे ठरवून त्याने डिजिटल पेटिंगकडे आपले लक्ष केंद्रित केले.इंटरनेट आणि साधनांवरून त्याचा शोध घेतला, त्याचा सराव सुरू केला.विशेषत: पोट्रेटमध्ये स्वारस्य घेऊन त्याने त्यात मेहनत घेतली. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे डिजिटल पोट्रेट त्याने सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे नाना पाटेकर,लता मंगेशकर आणि पुढे एकेक करीत त्याने कला, क्रीडा,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची चित्रे रेखाटली. त्याचा अनुकूल प्रतिसाद मिळाला आणि एकेक करता त्याने तब्बल एकहजाराहून अधिक पोर्टेट साकारले.त्याची दखल घेऊन वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने त्याचा गौरव केला आहे. एका छंदातून विश्वविक्रमापर्यंत पोहोचलेल्या प्रणवने आता त्यात आणखी रस घेतला आहे.