पुणे बंदच्या आवाहनाला पुण्यनगरीतील गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध ; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील तब्बल ४० गणेशोत्सव मंडळांचा बंदला पाठिंबा

0 25

पुणे,दि 12 ःछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या वक्तव्याचा खेदजनक निषेध व्यक्त करीत पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी १३ डिसेंबर पुणे बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला.

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, केसरीवाडा मंडळ, श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसह शहरातील ३६ गणेशोत्सव मंडळांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

अण्णा थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. ते आमचे प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहेत आणि कायम राहतील. देशातील इतर सर्वच महापुरुष आणि महान स्त्री व्यक्तिमत्वांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे व या सर्वांचे देशाप्रती असलेल्या अमूल्य योगदानाचे आम्हाला भान आणि अभिमान हे दोन्ही आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अपमानास्पद व्यक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या असून, या गोष्टीचा आम्ही खेदजनक निषेध व्यक्त करीत आहोत, खेदजनक यासाठी कारण आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमच्या श्रद्धास्थानाबद्दल अशी बेताल विधाने करीत आहेत.

यापुढे कधीही कोणत्याही व्यक्तीने मग ती राजकीय असो किंवा अराजकीय, छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल एक शब्द जरी चुकीचा किंवा अपमानास्पद काढला, तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही. याची नोंद घ्यावी व भविष्यात छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल बोलताना याचे भान राखावे, असे आवाहनही यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी केले.

error: Content is protected !!