सडलेली पानं झडलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

0 13

 

सडलेली पानं झडताहेत, ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसं उघडंबोडकं झालंय असं दाखवायचा प्रयत्न करताहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच विषयांवर चर्चा केली.

 

– मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की, ज्या वेळी मी ‘वर्षा’त राहात होतो तेव्हाचा अनुभव कथन केला होता. या घराच्या आवारातच दोन झाडं आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं आहे बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेली दोन-एक वर्षे बघतोय. ज्याला आपण पतझड म्हणतो… पानगळ… त्यात पानं पूर्ण गळून पडतात. फक्त काडय़ा राहतात. आपल्याला वाटतं, अरे या झाडाला काय झालं? पण दोन ते तीन दिवसांत पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात आणि मी बघितलंय, आठ ते दहा दिवसांत ते बदामाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं. गुलमोहरसुद्धा हिरवागार झाला. म्हणून ही सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत. त्यांना झडून जाऊ द्या!

 

आपण मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटलंत की, एक वादळ आल्याचा आभास होतोय. तुम्ही लक्षात घ्या, वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे.

 

खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय… तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात.

error: Content is protected !!