महाराष्ट्रातील निकालावरून धनंजय चंद्रचूड यांच्यावर संजय राऊत यांचे गंभीर आरोप…

0 198

 

महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची लढाई बरोबरीत सुरु होती. पण नंतर पुढच्या दोन तासांत सगळं चित्र बदललं. निकाल आधीच ठरला होता फक्त मतदान करुन घेतलं, मतदान होऊ दिलं. या सगळ्याला, महाराष्ट्रातील घडामोडींना जर जबाबदार कुणी असेल. तर ते माजी सरन्यायधीश डी. वाय चंद्रचूड… देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्याने आमदार अपात्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता. मग तुम्ही कशाकरता बसलेला आहात? अडीच तीन वर्षे तुम्ही निर्णय देत नसाल. तर तुम्ही खुर्च्या कशा करता उबवताय?, अशा शब्दात संजय राऊतांनी चंद्रचूड यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे चंद्रचूड हे प्राध्यापक म्हणून ते भाषणं द्यायला चांगले आहेत. पण सरन्यायाधिश म्हणून घटनात्मक पेचावर ते निर्णय देऊ शकलेले नाहीत. यासाठी इतिहास त्यांना माफ करू शकणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज जे चित्र दिसतंय ते चित्र नक्कीच दिसलं नसतं. त्यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराचे दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. आता सुद्धा कुणी कुठे कशाही उड्या मारू शकेल. कारण लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

 

जनतेच्या न्यायालयातही न्याय विकत घेण्यात आला. पैसा प्रचंड वापरण्यात आला. आम्ही निराश नाही पण आम्हाला वाईट जरुर वाटलं. महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता आम्हाला आहे. मतविभागणी हा सर्वात मोठा फॅक्टर ठरला. मतविभागणीचे जे अडथळे निर्माण केले त्याकडे त्यांनी लक्ष दिलं. मनसे, वंचित यांना मॅनेज करुन ठिकठिकाणी कमी कमी मतांनी पाडण्यात आले ते चित्र मुंबईसह सगळीकडे पाहता येईल. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी काय तीर मारला आहे? संघाची भूमिका ही या निवडणुकीत महत्त्वाची राहिली आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी विषारी प्रचार केला, त्याचा आम्हाला फटका बसला. शरद पवारांसारखा मोठा नेता आहे महाराष्ट्रातला त्यांनी या राज्यांत गद्दारांविरोधात भूमिका घेतली. त्यांना प्रतिसाद मिळत होता. त्यांना मानणारा वर्ग आहे तिथे त्यांचे उमेदवार पडले असतील तर तो गंभीर विषय आहे. एकनाथ शिंदे हे काही मोठा विचार घेऊन राजकारणात आलेले नाही. त्यांनी शिवसेनेशी बेईमानी करुन मोदी शाह यांच्या मदतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

error: Content is protected !!